मुंबईतील जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपाच्या समर्थनार्थ पुण्यात ससून सवरेपचार रुग्णालयातील २५० निवासी डॉक्टर शुक्रवारपासून संपावर जात आहेत. ‘मास बंक’वर जाण्याचे ठरवले असले तरी अत्यावश्यक सेवा बंद करणार नसल्याचे या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स’ (मार्ड) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने शुक्रवारपासून राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘मार्ड’चे सुमारे २००० निवासी डॉक्टर आहेत. जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या बदलीची मागणी संघटनेने केली आहे. डॉ. लहाने आणि डॉ. पारेख हे विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करू देत नसून वैद्यकीय शिक्षणातील प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही, असा तिथल्या डॉक्टर विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या कारणासाठी जे. जे.चे निवासी डॉक्टर सोमवारपासून संपावर आहेत.
ससूनमधील निवासी डॉक्टर व ‘मार्ड’चे उपाध्यक्ष डॉ. नीलेश बाष्टेवाड म्हणाले, ‘आम्ही जे. जे.च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहोत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबाबत तक्रार नाही. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून ‘मास बंक’ सुरू होईल, परंतु ज्या निवासी डॉक्टरांची अत्यावश्यक सेवेसाठी डय़ूटी आहे ते कामावर असतील.’
बी. जे.मधील सर्व सहयोगी प्राध्यापक व व्याख्याते संपकाळात ससूनमध्ये वैद्यकीय सेवा देणार असून क्लिनिकल व पॅराक्लिनिकल सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी वर्गालाही मदतीस घेतले जाईल, असे ससून प्रशासनातर्फे सांगण्यात आले.