दिवाळीच्या सुटीमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये जाण्यासाठी एसटीच्या वतीने पुणे विभागातून सुमारे अडीच हजार जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीच्या कालावधीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानाबरोबरच स्वारगेट स्थानकावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मार्केटयार्ड येथे पर्यायी तात्पुरते स्थानक उभारण्यात येणार आहे.
एसटीचे विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी- चिंचवड स्थानकातून जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट बस स्थानकावरून सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव, हुबळी व कोकणात गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी यंदा मार्केटयार्डातील जनावरांच्या बाजाराशेजारील जागेत पर्यायी स्थानक उभारण्यात येणार आहे.
शिवाजीनगर, अभियांत्रिकी महाविद्यालय येथून नाशिक, औरंगाबाद, जळगाव, लातूर, नंदूरबार, परभणी, धाराशीव, साक्री, हिंगोली, उमरगा, तुळजापूर त्याचप्रमाणे मराठवाडा, विदर्भातील इतर भागात गाडय़ा सोडण्यात येतील. शिवाजीनगर स्थानकाच्या वतीने सांगवी येथूनही गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. िपपरी- चिंचवड व पुणे स्टेशन स्थानकातूनही विविध ठिकाणी गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
गाडय़ांचे आरक्षण मंगळवारपासून सुरू होणार आहे. बस स्थानकांसह एसटीच्या संकेतस्थळावरूनही आरक्षण करता येणार आहे. अधिक माहितीसाठी स्वारगेट (२४४४८७९४), शिवाजीनगर (२५५३६९७०), पुणे स्टेशन (२६१२६२१८), िपपरी- चिंचवड (२७४२०३००), डेक्कन जिमखाना (२५४२१६९४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.