पुण्यात आज दिवसभरात करोनाचे १५९९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बाधित झालेल्या करोना रुग्णांची संख्या ४४ हजार ६५ एवढी झाली आहे. दरम्यान आज पुणे जिल्ह्यात करोनाची बाधा होऊन ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पुण्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार १०४ इतकी झाली आहे. आज ७७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत २५ हजार ९०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

पिंपरीत २१ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउनच्या दहाव्या दिवशी ७१६ करोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १७ जण हे महापालिका हद्दीतले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ३९८ जण करोनामुक्त झाले आहेत त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या १४ हजारांच्या दिशेने वाटचाल करते आहे. आत्तापर्यंत पिंपरीत करोना रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ७८४ इतकी झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९ हजार ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला ३ हजार ४४७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत.