पुणे : शहरात दररोज चाचण्यांच्या तुलनेत बाधित सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २१ ते २३ टक्के  होते. गेल्या चार दिवसांत हे प्रमाण २६ ते २८ टक्क्यांवर गेले आहे. या पार्श्वभूमीवर ससून आणि सीओईपी ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे, खासगी रुग्णालयांमध्येही करोना रुग्णांसाठी खाटा वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

करोनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. राव म्हणाले, ‘पुणे महापालिका क्षेत्रात १५ ऑगस्टपासून एक लाख ७० हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३८ हजार जणांना बाधा झाली. हे प्रमाण २८ टक्के  आहे. याच कालावधीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख ३८ हजार चाचण्यांत २६ हजार ९६ जणांना बाधा झाली. हे प्रमाण २५ टक्के , तर ग्रामीण भागात चार आठवडय़ांत ५६ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १४ हजार बाधित सापडले. हे प्रमाण २६ टक्के आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भाग मिळून पुणे जिल्ह्य़ात रुग्ण दुपटीचे प्रमाण सध्या ३२ दिवस आहे, अशी माहिती राव यांनी दिली. २१ ते २७ ऑगस्ट या काळात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात २० हजार ९८७ बाधितांपैकी १८ हजार ५८१ रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर गेले असून उर्वरित सक्रिय २० टक्के  रुग्णांपैकी १६.५ टक्के लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती.

बाधित सापडण्याचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले

ऑगस्ट अखेरीपासून शहरात मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. ऑगस्टच्या मध्यापर्यंत दररोज करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण २१ टक्के  होते. २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत हे प्रमाण २३ टक्के  झाले, तर गेल्या चार दिवसांत हेच प्रमाण २८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे दररोज चाचण्यांच्या तुलनेत बाधित सापडणाऱ्यांचे प्रमाण तब्बल सात टक्क्यांनी वाढले असल्याचे निरीक्षण महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी नोंदवले.