News Flash

चार हजार २६३ बालकांचे जन्मस्थान ‘१०८’!

मर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेसच्या १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ १० लाख २० हजार ६१० रुग्णांनी घेतला.

दहा लाख रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेसच्या १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ १० लाख २० हजार ६१० रुग्णांनी घेतला. विशेष बाब म्हणजे, चार हजार २६३ बालकांचा जन्म १०८ रुग्णवाहिकेतच झाला. एक जानेवारी ते २७ डिसेंबर २०१९ या कालावधीतील ही आकडेवारी असून महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागातर्फे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रस्ते अपघात, हिंसा, भाजण्याचे अपघात, हृदयरोग, विषबाधा, वीज पडणे, आत्महत्या किंवा तत्सम ईजा, प्रसूती आणि इतर अनेक वैद्यकीय तक्रारींनी ग्रासलेल्या रुग्णांनी अत्यावश्यक प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेची मदत घेतली आहे. वर्षभरामध्ये तब्बल तीनशे तेरा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेतील जीवरक्षक प्रणालीचा (व्हेंटिलेटर) उपयोग करण्यात आला आहे.

रस्ते अपघातात ५८ हजार ४४३ रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. नऊ हजार ६७८ हिंसाचाराच्या प्रसंगांमध्ये, दोन हजार ६०९ भाजण्याच्या घटनांमध्ये, एक हजार २४७ हृदय विकाराच्या रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकेचा उपयोग झाला. पडण्याच्या २३ हजार ९३८ घटनांमध्ये आणि २७ हजार २५ विषबाधेच्या घटनांमध्येही या सेवेचा उपयोग करण्यात आला. प्रसूतीच्या एक लाख ९२ हजार ३६० महिलांसाठी १०८ रुग्णवाहिका उपयुक्त ठरली. वीज पडण्याच्या ७४४ घटनांमध्ये, दोन हजार ४८४ छोटय़ा-मोठय़ा आपत्कालीन घटनांमध्ये, तसेच सहा लाख ४३ हजार ६८६ वैद्यकीय उपचारांसाठी ही सेवा वापरण्यात आली. त्याबरोबरच ६८६ पॉलिट्रॉमाच्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेने जीवदान दिले. ५७ हजार ८९ इतर रुग्ण आणि ६६५ आत्महत्यांच्या रुग्णांना देखील १०८ रुग्णवाहिका सेवेचा उपयोग झाला.

नंदूरबार जिल्ह्य़ात सर्वाधिक प्रसूती

बीव्हीजी महाराष्ट्र अत्यावश्यक आरोग्य सेवा विभागाचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती १०८ रुग्णवाहिकेत यशस्वीरीत्या होत आहे. प्रत्यक्ष प्रसव वेदना सुरू होईपर्यंत गरोदर महिला किंवा तिचे कुटुंबीय वैद्यकीय सेवा घेत नाहीत. अशा वेळी १०८ वर अवलंबून राहण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेषत: नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्य़ातील सर्वाधिक प्रसूती १०८ मध्ये झाल्या आहेत.

महापुरात १०८ ने तारले

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात हाहाकार माजवलेल्या महापुरात १०८ रुग्णवाहिका सेवेने अनेक रुग्णांचे जीव वाचवले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील निवडे गावी एका २६ वर्षीय गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिच्या नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यावेळी पुराचा वेढा असलेल्या निवडे गावात त्या महिलेपर्यंत रुग्णवाहिका नेणे शक्य नव्हते. त्यावर उपाय म्हणून स्ट्रेचर महिलेपर्यंत पोहोचून तिला रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले. अशा अनेक रुग्णांवरील उपचारात १०८ रुग्णवाहिकेने योगदान दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 5:21 am

Web Title: 263 children were born in 108 ambulance zws 70
Next Stories
1 शहर स्वच्छतेसाठी झटणाऱ्या सेवकांवर मुजोर नागरिकांची दंडेलशाही
2 पुणे-सातारा महामार्गाचे काम वेगाने करण्यासाठी पाठपुरावा सुरू
3 कृषी उत्पादनांपासून पर्यायी इंधनासाठी सरकार कटिबद्ध-गडकरी
Just Now!
X