एका दिवसांतील सर्वाधिक संख्या, ३०८ नवे रुग्ण

पुणे : मंगळवारी २७ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्य़ातील मृतांची एकूण संख्या ३७४ झाली आहे. आजपर्यंत नोंदवले गेलेले एकाच दिवसातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. मृतांपैकी २४ रुग्ण पुणे शहरातील, दोन रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील तर एक रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी आहे. दिवसभरात ३०८ नव्या रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंगळवारी रात्री याबाबत माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी दगावलेल्या २७ रुग्णांपैकी ११ रुग्ण ससून रुग्णालयात, चार रुग्ण पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात, एक रुग्ण नायडू रुग्णालयात तर उर्वरित रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. मंगळवारी नव्याने लागण झालेल्या ३०८ रुग्णांपैकी २५६ रुग्ण पुणे आणि ३१ रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. ग्रामीण भागातील १३ तर जिल्हा रुग्णालय आणि छावणी परिसरातील आठ रुग्णांना नव्याने करोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांतील प्रलंबित चाचण्यांमधून हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या ८१३४ झाली आहे.

पुणे शहरातील १६९ रुग्णांना मंगळवारी पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ४११९ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सात रुग्ण मंगळवारी घरी परतले, त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २८३ झाली आहे.