खासगी ठेकेदारांकडून घेतलेल्या भाडेतत्त्वावरील गाडय़ांचे लाखो रुपये थकल्यामुळे ठेकेदारांनी त्यांच्या पावणेतीनशे गाडय़ा मंगळवारी बंद ठेवल्या. ठेकेदारांनी १ जून रोजीही अशाच प्रकारे गाडय़ा बंद ठेवल्या होत्या. या प्रकारामुळे ठेकेदारांना देण्यासाठी पीएमपीकडे निधी नसल्याचे स्पष्ट झाले असून गाडय़ा मार्गावर न आल्यामुळे पीएमपीवरही नामुष्की ओढवली आहे.
पीएमपीने सात ठेकेदारांकडून २७२ गाडय़ा भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. त्यांचे पैसे दरमहा दिले जातात. मात्र, तीन महिन्यांचे पैसे थकल्यामुळे ते मिळण्यासाठी १ जून रोजी ठेकेदारांनी दिवसभर गाडय़ा बंद ठेवल्या होत्या. ठेकेदारांचे जे पैसे थकले आहेत ते सात दिवसांत दिले जातील, असे आश्वासन स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे आणि पीएमपीचे संचालक, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी त्या दिवशी दिले होते. त्या आश्वासनानंतर बंद मागे घेण्यात आला. मात्र, त्या आश्वासनानंतरही एकाच महिन्याचे पैसे ठेकेदारांना देण्यात आले. अखेर थकीत रक्कम मिळण्यासाठी मंगळवारपासून ठेकेदारांनी बेमुदत बंद सुरू केला. या बंदमुळे पीएमपी प्रवाशांची दिवसभर चांगलीच गैरसोय झाली तसेच पीएमपीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आमच्या गाडय़ा बंद राहिल्या असल्या, तरी आम्ही संप केलेला नाही. मात्र, आम्हाला पैसे मिळत नसल्यामुळे आमच्या चालकांचे तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे पगार, डिझेलची खरेदी करणे आता अशक्य होत आहे. तसेच गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती करणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी आम्हाला आमची बिले मिळणे आवश्यक आहे. ते पैसे मिळाल्यानंतर आम्ही गाडय़ा रस्त्यावर आणू, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील साडेअकराशे गाडय़ा सध्या मार्गावर आणल्या जात असून त्याशिवाय २७२ गाडय़ा भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.
ठेकेदारांनी गाडय़ा बंद ठेवल्यानंतर त्याची दखल पीएमपी प्रशासनाने मंगळवारी घेतली नाही. तसेच या प्रश्नाबाबत अधिकारी, संचालक आणि ठेकेदार यांची बैठकही झाली नाही. त्यामुळे बंद बुधवारीही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 2:40 am