शालेय शिक्षण विभागाकडून राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या ‘स्वाध्याय’ उपक्रमात २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यात जळगाव, बुलढाणा आणि नांदेड या जिल्ह््यांतील सर्वाधिक विद्यार्थी आहेत. या उपक्रमात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संवाद ठेवून विद्यार्थ्यांचे आकलन तपासण्यात येत आहे.

करोना प्रादुर्भावामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे शाळा नियमितपणे सुरू होऊ शकल्या नाहीत. या पाश्र्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ यांच्यातर्फे ‘स्वाध्याय’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांची साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यावर भर आहे. उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील दहा आणि भाषेतील दहा प्रश्न सरावासाठी पाठवले जातात. विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे पाठवल्यावर त्यांना त्यांची शैक्षणिक कामगिरी समजते. विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून शिक्षकांना चांगल्या पद्धतीने उपाययोजना करणे शक्य होत आहे.

आतापर्यंत या उपक्रमात राज्यभरातील २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गेले सतरा आठवडे हा उपक्रम सुरू आहे. जळगाव, बुलढाणा आणि नांदेड जिल्ह््यांतील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. त्यात जळगाव जिल्ह््यातील २ लाख ३३ हजार ७११, बुलढाणा जिल्ह््यातील १ लाख ९६ हजार ६५१ आणि नांदेड जिल्ह््यातील १ लाख ३० हजार ६४१ विद्यार्थी आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली.

सात जिल्ह््यांतून कमी प्रतिसाद

रत्नागिरी, मुंबई शहर, परभणी, सिंधुदुर्ग, लातूर, पालघर आणि बीड या जिल्ह््यांतून कमी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रत्नागिरी जिल्ह््यातील १ हजार ६२०, मुंबई शहरचे १ हजार ५९३, परभणी जिल्ह््यातील १ हजार ३३०, सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १ हजार २३, लातूर जिल्ह््यातील ८६३, पालघर जिल्ह््यातील ८५७ आणि बीड जिल्ह््यातील ४५५ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.