News Flash

स्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास

निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निरीक्षण

निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निरीक्षण

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टिंबर मार्केट शाखेत शिरलेल्या चोरटय़ांनी बँकेतील रोखपालाच्या मागील बाजूस ठेवलेली २८ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सीसीटीव्ही चित्रीकरणात बँक कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून चोरटय़ांनी रोकड ठेवलेली पेटी चोरून नेल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडून चित्रीकरण पडताळण्यात आले. या घटनेमागे बँक कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निरीक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदविले.

बँकेतील अधिकारी वर्तिका प्रांशु श्रीवास्तव (वय ३५,रा. हडपसर) यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकाजवळ (हॉटेल सेव्हन लव्हज चौकाजवळ) स्टेट बँक ऑफ इंडियाची टिंबर मार्केट  शाखा आहे. सकाळी अकरा ते सव्वाअकराच्या दरम्यान एकापाठोपाठ सात ते आठ जण बँकेत शिरले. त्यांनी बँकेत असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर बोलण्याचा बहाणा केला. त्यावेळी बँक कर्मचाऱ्याचे लक्ष चुकवून एक चोरटा काऊंटरच्या मागील बाजूस गेला. त्याने कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधली आणि रोकड ठेवलेली पेटी उचलून नेली. काही वेळानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पेटीत २८ लाख ९ हजार ३०० रुपयांची  रोकड असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक निरीक्षक वैभव पवार, उमाजी राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

बँकेतून रोकड ठेवलेली पेटी चोरणाऱ्या चोरटय़ांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. चोरटय़ांनी पेटी उचलून नेल्यानंतर रोकड काढून घेतली आणि बँकेपासून काही अंतरावर पेटी टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत.

– शिरीष सरदेशपांडे,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 5:29 am

Web Title: 28 lakhs cash from sbi branch looted by robbers in pune
Next Stories
1 विकासाला गती; पण फुगवटय़ाचा प्रश्न कायम
2 महिला स्वच्छतागृहे अखेर खुली
3 पुण्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेत्यांचे दौरे वाढले!
Just Now!
X