मागील २४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये संस्कार प्रतिष्ठान हे मूर्तीदान आणि निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे. या वर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवला असून दुपारपर्यंत तब्बल २८ हजार मूर्ती दान झालेल्या आहेत. रात्री उशिरा पर्यंत ५० हजार मूर्तीदान होतील असे संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबवलेला जात आहे असे ते म्हणाले.
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी संस्कर प्रतिष्ठान, डी. वाय. पाटील. महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि काही संस्था मिळून मूर्तीदानाचा आणि निर्माल्य जमा करण्याचा उपक्रम राबवत आहेत. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत भरभरून प्रतिसाद मिळत असून दुपार पर्यंत २८ हजार मूर्तीदान झालेल्या आहेत. तर रात्री १२ वाजे पर्यंत तब्बल ५० हजार मूर्तीदान होतील असे संस्कर प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. खरतर गणरायांच्या मूर्त्या ह्या पर्यावरण पूरक नसल्याने त्यांच्या विसर्जनामुळे नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. हे पाणी मानवी शरीरात गेल्यास अनेक प्रकारचे रोगही होऊ शकतात. हे रोखण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान मूर्तीदानाचा उपक्रम राबवत आहे. मागील वर्षी ४३ हजार मूर्तीदान झाल्या होत्या, दरम्यान मूर्तीदान केलेल्या मूर्ती ट्रकमध्ये भरून पिंपरी-चिंचवड शहरातील एका छोट्या तलावात विधिवत पूजा करून विसर्जन केल्या जातात. यामुळे नदी प्रदूषण रोखण्यात काही प्रमाणात यश येते.

मूर्तीदान करण्याकडे गणेश भक्तांचा कल
थेरगाव येथील घाटावर महानगर पालिकेकडून एक कृत्रिम हौद तयार करण्यात आला असून यात गणपती मूर्तींचे विसर्जन करून ती मूर्ती संस्कार प्रतिष्ठानकडे नेवून दिली जाते. नदीचे वाढते प्रदूषण आणि नदीला दरवर्षी वाहते पाणी नसते. मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर अनेकदा मूर्ती दोन दिवसांनी तुटलेल्या अवस्थेत दिसून येते, त्यामुळे मागील पाच वर्षांपासून मूर्तीदान करत असल्याचे गणेशभक्त आकाश हुशारे यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी देखील प्रदूषण रोखण्यासाठी मूर्तीदान करावं असं आवाहनही त्यांनी केले आहे.

चिंचवडमध्ये गणपती बाप्पाचं होडीमधून विसर्जन
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात आज गणपती बाप्पांच विसर्जन करण्यात येत आहे. ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप दिला जात आहे. या निरोपाच्या क्षणी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वजण भावुक होताना दिसत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुणे जिल्ह्यात पाऊस जास्त असून नदी काठोकाठ भरून वाहात आहे. त्यामुळे चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिराच्या घाटावर गणपतीचे होडीमध्ये बसून विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात येत आहे. घाटावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.