‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या तरुणीने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर आरोपी तरुणानेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर पिंपरी- चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आमीर इम्तियाज मुन्शी (वय २९) हा तरुण खासगी कंपनीत कामाला असून तीन वर्षांपासून त्याची २६ वर्षांच्या तरुणीसोबत मैत्री होती. जानेवारी २०१७ पासून दोघेही पिंपळे सौदागर येथे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, आमीरला लिव्ह इन रिलेशनशिपऐवजी तिच्यासोबत लग्न करुन एकत्र राहायचे होते. आमीरने तिच्याकडे लग्नाचा तगादाही लावला. शेवटी ती तरुणी आमीरला सोडून त्याच परिसरात राहणाऱ्या तीन मैत्रिणींच्या घरी मुक्कामाला गेली. यामुळे आमीर नाराज होता. याच रागातून सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आमीर तिच्या घरी गेला. तिच्या मैत्रिणीने दरवाजा उघडताच आमीर थेट घरात घुसला. त्या तरुणीच्या हातावर चाकूने वार केल्यानंतर आमीरने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोंधळात तिच्या मैत्रिणीही घाबरल्या होत्या. मात्र, दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आमीरवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला अटक केली जाणार आहे. आमीरच्या या कृत्याचा त्याच्या आई – वडिलांनाही मानसिक धक्का बसला आहे. आरोपी आमीर हा विवाहित असून त्याची पत्नी आणि मूल हे आमीरचे आई वडील सांभाळतात.