पुण्यात आज दिवसभरात नव्याने २९४ रुग्ण आढळल्याने, प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. शहराची एकूण रुग्णसंख्या ७ हजाराच्या वर गेलेली आहे. आज दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 352 वर पोहचली आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २२९ रुग्णांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या दिवसाअखेर ४ हजार ३४८ रुग्ण करोना मुक्त झाले आहे.

दरम्यान, करोनाच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे भरमसाठ दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या खासगी प्रयोगशाळेत करोनाच्या चाचणीसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागत असल्याने गरीब रुग्णांना ते परवडू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन हे दर कमी करण्यासाठी या समितीची स्थापन करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वाटाघाटी करून दर कमी करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यांमध्ये आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश आहे