उन्हाळी शिबीरानिमित्त पुण्यात आलेल्या तीन मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तीन पैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

चेन्नईतील एका इंग्रजी शाळेतील काही विद्यार्थी पुण्यातील मुळशी धरणाजवळ समर कॅम्पसाठी आले आहेत. यातील तीन मुलं कातरखडक परिसरात पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. दानिश राजा, संतोष के आणि सर्वानन अशी या मुलांची नावे आहेत. तिघेही १३ वर्षांचे होते. यातील दानिशचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

मुळशीतील एका सामाजिक संस्थेने मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन केले होते. १३ ते १५ वर्ष या वयोगटातील मुलं या कॅम्पमध्ये सहभागी झाली होती. बुधवारी रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरु झाली आहे. या घटनेमुळे उन्हाळी सुट्टीनिमित्त आयोजित होणाऱ्या समर कॅम्पमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.