भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर, दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेजसमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन अतुल बारणे (वय २२), विनय ढवळे (वय २१, रा. सोमवार पेठ, पुणे) आणि करण शर्मा (वय २२, रा.भवानी पेठ, पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर पवन परदेशी आणि विनोद सणस (रा. पुणे) हे दोघे जण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन हा त्याच्या मित्रांसह फियाट मोटारीतून मुंबईला निघाले होते. लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजजवळ भरधाव मोटार असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार रस्ता दुभाजकावर आदळली. मोटारीने तीन ते चार पलटय़ा खाल्ल्या. त्यानंतर ती दुसऱ्या एका मोटारीला जाऊन धडकली. या अपघातात चेतन हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चौघांना उपचारासाठी निगडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विनय आणि करण यांचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.