सिकंदराबादहून मुंबईकडे जात असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसने रेल्वेफाटक ओलांडत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दिलेल्या धडकेत तीन ऊसतोडणी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले. हा अपघात दौंड तालुक्यातील यवतनजीक खामगाव फाटा येथे शनिवारी सकाळी घडला. विशेष म्हणजे गाडी येत असतानाही रेल्वेफाटक उघडेच होते. खामगाव येथील गेटमन जयपाल धर्मपालसिंग यादव (वय ३२, रा. यवत) याला पोलिसांनी अटक केली आहे.
खामगाव फाटा येथे शनिवारी सकाळी पुण्याकडून सोलापूरला जाणारी मालगाडी गेली. त्यानंतर लगेचच दुरांतो एक्स्प्रेस जाणार होती. मात्र, यादरम्यान फाटक उघडेच राहिले. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांचा भरणा असलेला ट्रॅक्टर ट्रॉली फाटक ओलांडून पुढे जाऊ लागली. त्याच वेळी मुंबईकडे जाणारी दुरांतो एक्स्प्रेस भरधाव वेगाने आली. ट्रॅक्टर ट्रॉलीला गाडीने जोरदार धडक दिली. त्यात कारभारी विठोबा महानवर (वय ५०), इंदूबाई भाजीनाथ हंडाळ (वय ४५, दोघेही रा. तांबेवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) आणि ताईबाई नामदेव बर्डे (वय ५५ रा. मंचरवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) हे तीन जण जागीच ठार झाले. तर १९ जण जखमी झाले. जबर जखमी झालेल्या चार जणांना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे आणि दोघांना दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटल येथे उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. तर, पाच जखमींवर खामगाव येथील श्री सेवा हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाने ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमी रुग्णांना २५ हजार रुपयांची तर, किरकोळ जखमींना ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य़ केले जाणार आहे.
अपघाताच्या आधी काही वेळापूर्वी या फाटकाजवळून पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी मालगाडी गेली होती. त्यानंतर फाटक उघडले, ते उघडेच राहिले होते. त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली पलीकडे जात होती. त्याच वेळी सिकंदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेससाठी हिरवा सिग्नल लागलेला होता. त्यामुळे वेगाने येणाऱ्या एक्स्प्रेसची या ट्रॉलीला ठोकर बसली. त्यामुळे हा अपघात झाला, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.