एकाच वेळी सर्व भावांना आपल्या बहिणींना भेटता यावे या उद्देशातून कार्यालय घेऊन भाऊबीज साजरी करण्याच्या उपक्रमाचा रविवारी सुवर्णमहोत्सव साजरा झाला. जोगळेकर-भट-साने परिवाराच्या या अनोख्या स्नेहमेळाव्यास ७५ वर्षांच्या आजीपासून ते सहा महिन्यांची बालिका अशा चार पिढय़ांतील १३५ जणांची उपस्थिती होती.
अरविंद विनायक जोगळेकर यांनी १९६३ मध्ये सामूहिक भाऊबीज हा उपक्रम सुरू केला. जोगळेकर यांच्या या उपक्रमामध्ये दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासह भट आणि साने या आतेबहिणी देखील यामध्ये सहभागी झाल्या. सुरुवातीला २५ व्यक्ती असलेल्या या उपक्रमामध्ये मुले देखील सहभागी होत गेल्याने ही संख्या आता १३५ झाली आहे. श्रुती मंगल कार्यालयामध्ये भाऊबीजेनिमित्त रविवारी हा स्नेहमेळावा रंगला. ‘दिल्ली मेट्रो’ येथे काम करणारी प्राजक्ता रावत ही जोगळेकर यांची कन्या खास भाऊबीजेसाठी दोन दिवसांची रजा काढून आवर्जून उपस्थित राहिली. तर, कटक येथे स्थायिक झालेला त्यांचा भाऊ ५० वर्षांत प्रथमच या स्नेहमेळाव्यामध्ये सहभागी झाला. या कुटुंबातील ज्येष्ठ वीणा गर्भे ज्येष्ठ नागिरक संघ पुणे (अ‍ॅस्कॉप) आणि विवेकानंद केंद्राच्या सक्रिय कार्यकर्त्यां आहेत.
जंगली महाराज रस्त्यावर माझे प्रोव्हिजन स्टोअर होते. त्यामुळे दुकान बंद झाल्यावर मला बहिणीकडे जायला रात्र व्हायची. माझे भाऊ हे दखील व्यवसायामध्ये असल्याने त्यांनाही असाच उशीर होत असे. हे टाळण्याच्या कल्पनेतून एकत्रित भाऊबीज साजरी करण्याची संकल्पना पुढे आली. आमच्या नंतरच्या पिढीमध्ये २३ मुली आहेत. दरवर्षी तिघी जणी एकत्र येऊन सहा महिन्यांपासून या कार्यक्रमाची आखणी करतात. यापूर्वी आनंद मंगल कार्यालय, हॉटेल पूनम, हॉटेल स्वरूप, विष्णूकृपा हॉल, रसोई डायनिंग हॉल येथे भाऊबीज साजरी झाली आहे, असेही जोगळेकर यांनी सांगितले.