सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे महापालिका दोन लाख ९९ हजारांची देणगी देणार असून तसा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सासवड येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाला महापालिकेने आर्थिक स्वरूपाची मदत करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. तो मंजूर झाला असून मंजूर प्रस्तावानुसार महापालिका साहित्य संमेलनासाठी दोन लाख ९९ हजारांची देणगी देणार आहे. सासवड येथे ३ ते ५ जानेवारी दरम्यान ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून सध्या त्याच्या व्यवस्थांचे नियोजन सासवड येथे सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे विविध साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच साहित्यिक आपल्या घरी हा वेगळा उपक्रमही राबवला जाणार आहे. या उपक्रमात सासवडमध्ये संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिकांची घरोघरी निवास व्यवस्था केली जाणार आहे. सासवडमधील शंभर कुटुंबांनी आतापर्यंत तशी तयारी दर्शवली आहे.