रस्त्यावर उभी केलेली मोटार काढण्यास सांगितले म्हणून गस्तीवर असलेल्या बीट मार्शलला लष्काराच्या आर्मी मेडिकल कोअरच्या चार जवानांनी मारहाण केली. त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्याजवळील वॉकीटॉकी आणि पिस्तूल हिसकावून घेतले. वानवडीतील मिल्ट्री कॉम्पलेक्सजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
सचिन भिकू गाढवे (वय २७) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश मोतीराम माने (वय ३२), धीरज शंकरलाल प्रसाद (वय ३८, रा. विक्रम बत्रा कॉम्प्लेक्स, वानवडी) आणि सुरेश सांगळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. आरोपी हे वानवडी येथील आर्मी मेडिकल कोअरमध्ये नर्सिग असिस्टंट म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवे व त्यांचे सहकारी भामे हे सोमवारी गस्तीवर होते. वानवडी बाजार येथे गस्तीवर असताना विक्रम बत्रा कॉम्प्लेक्स समोर एक मोटार रस्त्यावर उभी असल्याने ती गाढवे यांनी बाजूला घेण्यास सांगितली. त्यामुळे चौघांनी गाढवे यांना ‘तुम्ही आमच्या मिल्ट्रीच्या एरियात का आलात’ असे म्हणून मारहाण केली. त्यांच्याकडील वॉकीटॉकी आणि पिस्तूल काढून घेतले. हा प्रकार पाहिल्यानंतर एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. वानवडी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी दोघांना जागीच अटक केली. प्रसाद आणि माने यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला.