रेंजहिल्सजवळ उभ्या राहत असलेल्या एका मोठय़ा गृहप्रकल्पाच्या लाभासाठी जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ात आवश्यकता नसताना ३० मीटर रुंदीचा रस्ता आखण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. गणेशखिंड ते औंध दरम्यानचा हा रस्ता फक्त एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकासाठी आखल्यामुळे रस्ता तयार करताना भांबुर्डा टेकडी फोडावी लागेल, असेही मनसेचे म्हणणे आहे.
मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, गटनेता वसंत मोरे आणि स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. गणेशखिंड ते औंध दरम्यान सध्या वैकुंठ मेहता इन्स्टिटय़ूटजवळून जाणारा सहा मीटर रुंदीचा एक रस्ता अस्तित्वात आहे. मात्र, या भागात लोकवस्ती वा कार्यालये नसल्यामुळे या रस्त्याचा वापरच कमी प्रमाणात होतो. या रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाचा मोठा प्रकल्प उभा राहणार असून तेथे वीस ते पंचवीस मजली इमारती उभ्या करण्यासाठी अस्तित्वातील रस्ता किमान ३० मीटर रुंदीचा रस्ता असणे आवश्यक आहे. तसा रस्ता येथे विकसित झाल्यास टोलेजंग इमारती उभ्या करणे शक्य होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे १०० मीटर उंचीपर्यंतच्या इमारती उभ्या करता येणार आहेत. त्यामुळे आवश्यकता नसताना हा रस्ता आखण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
या भागाची भविष्यातील गरज पाहता सध्याचा रस्ता पुरेसा आहे. असे असतानाही हा रस्ता आखण्यात आल्यामुळे महापालिकेची एक शाळाही या रस्त्याने बाधित होत आहे. तसेच भांबुर्डा टेकडीच्या काही भागातून हा रस्ता आखण्यात आल्यामुळे टेकडीचाही काही भाग रस्त्यासाठी पाडावा लागेल. या रस्त्यामुळे भांबुर्डा वनविहाराचीही हानी होणार आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या लाभासाठीच रस्ता आखण्यात आल्यामुळे त्याला मनसेचा विरोध असून तशा हरकतीही स्थानिक रहिवाशांनी मोठय़ा प्रमाणावर महापालिकेकडे नोंदवल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.