पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉर्डन कॉलेज जवळ असलेल्या मोकळ्या जागेतील वाहनं पेटल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची सात वाहनं दाखल झाली आहेत. पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या या गाड्यांना आग लागली आहे. या आगीत जवळपास ३० वाहनं जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

वाहनाने पेट घेतला त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या गाड्या ठेवल्या जातात. अचानक या ठिकाणी असलेल्या वाहनांनी पेट घेतल्याचे समजताच आसपासच्या नागरिकांनी याबाबत पोलीस व अग्निशमन विभागास माहिती दिली. घटनास्थळाच्या आसपासचा परिसर हा रहिवासी परिसर असुन, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात हा परिसर येतो. सुरूवातीस आगीचं रौद्ररुप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता या नागरिकांमधून कारवाई करण्यात येणारी ही वाहनं दुसरीकडे ठेवली जावीत, अशी मागणी केली जात आहे.

अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील मॉर्डन कॉलेज जवळ असलेल्या मोकळ्या जागेत वाहतूक पोलिसानी ताब्यात घेतलेल्या दुचाकी, रिक्षा आणि चार चाकी वाहनांना आग लागल्याची माहिती  पावणे चार वाजेत्या सुमारास आम्हाला मिळाली. त्यानंतर काही क्षणात अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी गाड्या दाखल झाल्या. घटनास्थळी जवळपास १०० हून अधिक गाड्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाड्यांच नुकसान होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता पाण्याचा चारही बाजूने मारा केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तरी देखील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी अशी एकुण ३० हून अधिक वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप सांगता येणार नाही.