राज्यातील त्रुटी आढळलेली शिक्षणशास्त्र (डीएड) महाविद्यालयांपैकी जवळपास पन्नास टक्के म्हणजे सुमारे ३०० महाविद्यालये सुनावणीमध्येही दोषी आढळली असून या महाविद्यालयांबाबतचा अहवाल दिवाळीनंतर शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील (एससीईआरटी) अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात एकूण १ हजार ४५ डीएड महाविद्यालये आहेत. त्यातील वर्मा समितीच्या पाहणीमध्ये दोषी आढळलेली महाविद्यालये वगळून उरलेल्या ७४५ महाविद्यालयांची पाहणी एससीईआरटीतर्फे जानेवारीमध्ये करण्यात आली होती. प्राथमिक पाहणीमध्ये राज्यातील ६०० महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. तांत्रिक गोष्टींचा बाऊ करून डीएड महाविद्यालयांमध्ये दोष काढले जात असल्याची ओरड संस्थाचालकांनी केली होती. त्रुटी आढळलेल्या महाविद्यालयांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी गेला महिनाभर या महाविद्यालयांची सुनावणी घेण्यात आली. मात्र, सुनावणीमध्येही पन्नास टक्के म्हणजे जवळपास ३०० महाविद्यालये दोषी आढळली आहेत. या महाविद्यालयांचा अहवाल दिवाळीनंतर शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती एससीईआरटीतील अधिकाऱ्यांनी दिली.
प्राथमिक पाहणीमध्ये निर्दोष आढळलेल्या महाविद्यालयांबाबतही तक्रारी येत असल्यामुळे काही जिल्ह्य़ातील सर्वच डीएड महाविद्यालयांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी प्राथमिक पाहणीमध्ये निर्दोष आढळलेली काही महाविद्यालये सुनावणी दरम्यान मात्र दोषी आढळली आहेत. या महाविद्यालयांबाबतही आता विचार करण्यात येणार आहे. हा अहवाल शासनाकडे आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे (एनसीटीई) पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत निर्णय होणार आहे.