घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये दर

डाळिंबांचा हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबांची विक्रमी आवक झाली. पुणे, सोलापूर जिल्ह्य़ातून डाळिंब उत्पादक शेतक ऱ्यांनी तीनशे टन डाळिंब रविवारी विक्रीसाठी पाठविली. आवक वाढल्याने डाळिंबांचे दर वीस ते पंचवीस टक्क्य़ांनी उतरले आहेत.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात डाळिंबांना प्रतिकिलोला पंचवीस ते तीस रुपये असा दर मिळाला. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुणे जिल्ह्य़ासह राज्यात शेतक ऱ्यांनी डाळिंबाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे. डाळिंबाला चांगले दर मिळत असल्याने शेतक ऱ्यांनी डाळिंब उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. एके काळी डाळिंबांना गणेशोत्सव, श्रावण महिन्यात मागणी असायची. आता मात्र डाळिंबांना वर्षभर मागणी असल्याने डाळिंबांना दर चांगले मिळत आहेत, असे मार्केट यार्डातील      डाळिंब व्यापारी अतुल जाधव यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात डाळिबांचा हंगाम सुरू होतो. साधारणपणे पाच महिने डाळिंबांचा हंगाम सुरू राहतो. लालभडक रंग असलेली डाळिंबे उत्तम प्रतीची मानली जातात. रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात बारामती, पुरंदर, सांगोला, अहमदनगर, इंदापूर, सातारा भागातून डाळिंबांची विक्रमी आवक झाली. त्यापैकी सर्वाधिक आवक नगर जिल्ह्य़ातून झाली. हंगामाच्या सुरुवातीला मोठी आवक झाल्याने दर उतरले आहेत. बाजारात एक किलो डाळिंबाला वीस ते साठ रुपये असे दर मिळाले आहेत. डाळिंबांची आवक क्रेट्समधून (प्लास्टिक जाळी) होते. एका क्रेटमध्ये साधारणपणे वीस किलो डाळिंब मावतात. येत्या काही दिवसात डाळिंबांची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे जाधव यांनी सांगितले.

बाजारात रविवारी सुमारे बारा ते पंधरा हजार केट्र्स आवक झाली. ही आवक सुमारे तीनशे टन आहे. पुढील दीड ते दोन महिने डाळिंबांची आवक चांगली राहील, असे व्यापारी सिद्धार्थ खैरे यांनी सांगितले.

डाळिंबांची आवक वाढण्यामागची कारणे

* पुणे, अहमदनगर, सोलापूर भागात डाळिंबांची मोठय़ा प्रमाणात लागवड

* दर चांगले मिळत असल्याने शेतक ऱ्यांचा डाळिंब लागवडीकडे कल

* सणासुदीच्या काळात मोठी मागणी; दर चांगले मिळतात

* डाळिंबाकडे नगदी फळ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढला