१ ऑक्टोबरपासून रक्कम बँक खात्यात जमा

छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीकरिता सोमवापर्यंत राज्यातील ३३ जिल्ह्य़ांमधून मिळून ३२ लाख ८ हजार अर्जाची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्यापैकी २६ लाख ७२ हजार ८५७ अर्ज शासन स्तरावर स्वीकारण्यात आले आहेत. येत्या १ ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँकखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असून कर्जमाफी आणि पिकविम्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कर्जमाफीमध्ये फसवणुकीचे प्रकार टाळून पारदर्शकता येण्यासाठी जिल्हास्तरावर शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. राज्यातील ३३ जिल्ह्य़ांमधून भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जापैकी २६ लाख ७२ हजार ८५७ अर्ज शासन स्तरावर स्वीकारण्यात आले आहेत. ३२ लाख ८ हजार अर्जाची ऑनलाइन नोंदणी आतापर्यंत झाली असून त्यातील चाळीस टक्के म्हणजे ८ लाख २० हजार अर्ज पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सहकार विभागाकडून राज्यभरातील कर्जमाफी आणि पिकविम्याच्या अर्जाचा आढावा घेण्यात येत असून त्यासाठी राज्यभर तात्पुरत्या स्वरूपात केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. ही मुदत १५ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर पुढील पंधरा दिवस सर्व अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार खात्याकडून ठेवण्यात आले आहे. बँकांना ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाही, असेही सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

थेट बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी बँकांमधील कोअर बँकिंग सिस्टीमचा आढावा घेण्याचे काम समांतर पातळीवर सुरू आहे. तसेच जिल्हा सहकारी बँकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यांचादेखील गावनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू आहे. १५ सप्टेंबरनंतर अर्जाची छाननी, परीक्षण करून १ ऑक्टोबरपासून बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.