प्रत्येक तहसील केंद्रावर प्रशिक्षण
पुणे : शहरासह जिल्ह्य़ात नवी ३२१ महा-ई-सेवा केंद्रे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रांच्या केंद्रचालकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे एकाच वेळी सर्व केंद्रचालकांना प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने आता प्रत्येक तहसील केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नागरिकांना पॅनकार्ड, पारपत्र, प्राप्तिकर विवरणपत्र, शिधापत्रिका, सातबारा उतारा, जन्म दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व दाखला असे विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रात उपलब्ध होतात. याबरोबरच आधार नोंदणी व दुरुस्तीची कामेही याच केंद्रांवर के ली जातात.
करोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील व्यवहार पूर्ववत झाले नसल्याने मोजकीच आधार केंद्रे, महा-ई-सेवा केंद्रे, सेतू केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्रे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ही नवी ३२१ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
त्यानुसार ३२१ महा-ई-सेवा केंद्रांसाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया करण्यात आली. त्याकरिता १२०० अर्ज प्रशासनाकडे आले होते. राज्य शासन आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) निकषानुसार पात्र ठरणाऱ्या केंद्र चालकांचे नवे आयडी क्रमांक तयार करण्यात आले आहेत. ही केंद्रे सुरू करण्यापूर्वी केंद्रचालकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
करोनामुळे एकाच वेळी सर्व केंद्रचालकांना प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने प्रशासनाकडून ग्रामीण भागात तालुका पातळीवर, तर शहरात तहसील केंद्रांवर प्रशिक्षण दिले जात आहे. ही प्रक्रिया संपताच प्रतिबंधित क्षेत्रे वगळून ही नवी महा-ई-सेवा केंद्रे नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
लोकसंख्येनुसार केंद्रे उपलब्ध
महापालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात दहा हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र, नगरपंचायत क्षेत्रात किमान एक के ंद्र, पाच हजार लोकसंख्या असलेल्या नगर पंचायत आणि ग्रामपंचायतीमध्ये क्षेत्रात प्रत्येकी किमान दोन केंद्र, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 30, 2020 12:40 am