06 July 2020

News Flash

अभियांत्रिकीच्या ३५ टक्क्य़ांपेक्षा अधिक जागा रिक्त

अभियांत्रिकी शिक्षणात आघाडीवर असलेल्या पुणे विभागांत अभियांत्रिकीच्या रिक्त जागाही सर्वाधिक आहेत.

अभियांत्रिकी शिक्षणात आघाडीवर असलेल्या पुणे विभागांत अभियांत्रिकीच्या रिक्त जागाही सर्वाधिक आहेत. पुणे विभागातील पन्नास टक्के महाविद्यालयांमध्ये गेली चार वर्षे ३५ टक्क्य़ांपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अहवालावरून समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी सर्वाधिक मागणी असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान शाखेत रिक्त जागांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे.
गेली काही वर्षे राज्यात अभियांत्रिकी शाखेच्या जागा रिक्त राहत आहेत. मात्र, त्याच वेळी गेल्या काही वर्षांत प्रवेश क्षमताही वाढत असल्याचे दिसत आहे. त्या पाश्र्वभूमीवर अभियांत्रिकीच्या गेल्या ४ वर्षांतील रिक्त जागांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर गेली सलग चार वर्षे म्हणजे २०१२ पासून ३५ टक्क्य़ांपेक्षा अधिक जागा रिक्त असलेल्या महाविद्यालयांचा अहवाल तंत्रशिक्षण संचालनालयाने तयार केला आहे.
राज्यात सर्वाधिक अभियांत्रिकी महाविद्यालये पुणे विभागांत म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तालुक्यांत मिळून आहेत. या विभागांत ११४ महाविद्यालये आहेत. त्यातील जवळपास पन्नास टक्के म्हणजे ५५ महाविद्यालयांमध्ये गेली चार वर्षे ३५ टक्क्य़ांपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचे विभागाच्या अहवालावरून दिसत आहे. यामध्ये पुण्यातील काही नामवंत संस्थाही आहेत. काही महाविद्यालयांमध्ये अगदी ७० टक्क्य़ांपर्यंत जागा रिक्त आहेत. मात्र, असे असतानाही गेली चार वर्षे विभागातील प्रवेश क्षमता वाढतानाही दिसत आहे. गेली काही वर्षे मागणी असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांत रिक्त जागांचे प्रमाण सर्वाधिक दिसत आहे. या विषयाच्या अगदी ९५ टक्के जागाही काही महाविद्यालयांत रिक्त राहिल्या असल्याचे दिसत आहे. त्या खालोखाल विद्युत अभियांत्रिकी शाखेसाठी मागणी कमी होत असल्याचे दिसत आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विषयाच्या रिक्त जागा कमी होण्याबरोबरच त्याची प्रवेश क्षमताही कमी होत चालली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 3:20 am

Web Title: 35 enginearing seats remaining vacant
Next Stories
1 पश्चिम घाट बचाव मोहिमेला पिंगोरी गावचा पाठिंबा
2 ‘युवा संमेलना’वर शनिवारी शिक्कामोर्तब!
3 शहरातील अनेक रस्त्यांवर रविवारपासून पे अ‍ॅन्ड पार्क
Just Now!
X