News Flash

चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाकडून पस्तीस लाख रुपयांचा अपहार

व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा

व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा

गणेशखिंड रस्त्यावरील राहुल चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाने साथीदारांच्या मदतीने ३५ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राहुल चित्रपटगृहाचा व्यवस्थापक शशिकांत चंद्रकांत नगरकर (रा. विनायकनगर, नवी सांगवी), सहाय्यक व्यवस्थापक सतीश भाऊराव शिंदे (रा. कवडेनगर, नवी सांगवी) त्रिंबक कोंडिबा भुजबळ (रा. रामनगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राहुल चित्रपटगृहाचे मालक शिवाजी गणपतराव जगताप (वय ५९, रा. गणेशखिंड रस्ता) यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्यवस्थापक नगरकर, शिंदे आणि भुजबळ यांनी संगनमत केले. सप्टेंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत तिकीट विक्रीतून जमा झालेले ४१ लाख ६९ हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी नगरकर यांना ले होते. मात्र, नगरकर यांनी शिंदे आणि भुजबळ यांच्याशी संगनमत करून ३५ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केला होता. चित्रपटगृहाचे मालक जगताप यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिघांनी रक्कम भरतो, असे त्यांना सांगितले होते. मात्र, गेले वर्षभर तिघेजण कामावर आले नाहीत. अखेर जगताप यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सागर काळे तपास करत आहेत.

 

सोमवार पेठेत गुंडांकडून शस्त्रसाठा जप्त

चार पिस्तूल, दहा काडतूस जप्त

पुणे: सोमवार पेठेतील दारुवाला पूल भागात पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तीन गुंडांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून चार पिस्तुले आणि दहा काडतुसे जप्त करण्यात आली. मध्यप्रदेशातील उमरटी गावातून देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्यांकडून गुंडांनी पिस्तुले विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय २९, रा. सोमवार पेठ, दारुवाला पूल), अतुल प्रभाकर नाडे (वय ३०, रा. लोहियानगर, गंज पेठ), गणेश ज्ञानेश्वर भालेराव (वय ३३, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे युनिट एकचे पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात, सहाय्यक फौजदार संभाजी भोईटे हे गस्त घालत होते. त्यावेळी दारुवाला पूल भागात देशी बनावटीचे पिस्तुलाची विक्री करण्याच्या तयारीत तीन गुंड असल्याची माहिती भोईटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावून आरोपी चव्हाण, नाडे, भालेराव यांना पकडले. त्यांच्याकडून चार पिस्तुले आणि दहा काडतुसे जप्त केली.

प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक थोरात, सहाय्यक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, भोईटे, रवींद्र कदम, शशिकांत शिंदे, प्रकाश लोखंडे, मेहबूब मोकाशी, रिजवान जिनेडी, अशोक माने, इरफान मोमीन, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, मोहन येलपल्ले, प्रशांत गायकवाड यांनी ही कारवाई केली.

बांधकाम व्यावसायिकांसाठी जमीन बळकावण्याचे धंदे

आरोपी चव्हाण याच्याविरुद्ध २४ गुन्हे दाखल आहेत. तर नाडे आणि भालेराव याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिघे आरोपी शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांसाठी जमीन बळकावण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या एक आरोपी हा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा खून करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आरोपीच्या मित्राचा खून केला होता. उमराटी गावातील शस्त्रास्त्र तस्कर रवींद्रसिंग चावला याच्याकडून आरोपींनी पिस्तुले विकत घेतली होती.

 

ठेवीदारांची फसवणूकप्रकरणी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा

तीन कोटी ९१ लाख रुपयांची फसवणूक

प्रतिनिधी, पुणे

ठेवीदारांच्या नावावर बनावट कर्जप्रकरण करून ३ कोटी ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिंचवड येथील औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रेवानंद केवजी भिरुड, संचालक सीताराम गोविंद पंडित, सुरेश रामचंद्र बडगे, कौतिक एकनाथ जंगले, वसंत हरीभाऊ पठारे, किरण दीपक देसाई, सोनाजी देवराम प्रधान, गोविंद कृष्णा काळे यांच्यासह चार महिला संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहकार विभागातील लेखापरीक्षक विजय भोईटे यांनी यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम पंडित यांनी महिला संचालकांशी संगनमत करून ठेवीदारांच्या नावाने बनावट कर्जप्रकरण तयार केले. बनावट कागदपत्रांव्दारे त्यांनी कर्जप्रकरण मंजूर करून घेतले. अन्य संचालकांशी संगनमत करून त्यांनी ३ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. सहकार खात्याकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात संचालकांनी ठेवीदारांच्या नावाने बनावट कर्जप्रकरण मंजूर करून अपहार केल्याचे उघड झाले. पोलीस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:28 am

Web Title: 35 lakh rupees embezzlement form theater manager
Next Stories
1 बोलताना काळजी घ्या !
2 कर जमा; पण थकबाकीदारांचा प्रश्न कायम
3 पुण्यातील कबुतरबाजी
Just Now!
X