करोना संकटकाळातही टाटा मोटर्स कंपनीने कामगारांना दिवाळीसाठी ३५ हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाचा लाभ कंपनीतील सुमारे सहा हजार कामगारांना होणार असल्याचे सांगण्यात आले.

टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बिझनेस स्कोर कार्ड (बीएससी)चा आधार घेऊन बोनसचे सूत्र ठरवण्यात आले आहे. या सूत्रानुसार, कामगारांना गेल्या वर्षी ३८ हजार २०० रूपये बोनस देण्यात आला होता. आतापर्यंतच्या वाटचालीत बोनसची ही रक्कम सर्वाधिक ठरली होती.

यंदाच्या वर्षी करोना विषाणू संसर्गामुळे पूर्णपणे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही टाटा मोटर्सने कामगारांना दिवाळीसाठी घसघशीत बोनस जाहीर केला आहे.