जुन्नर तालुक्यातील आणे येथील अपंग कल्याण केंद्रातील १६ वर्षीय मुलीवर शिपाई महादू ऊर्फ महादेव बोराडे याने बलात्कार केल्याची फिर्याद मंगळवारी नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. बोराडे याने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दिलेल्या मुलींची संख्या आता तीन झाली आहे. दरम्यान, बोराडे याला पाठिशी घालणारा उपमुख्याध्यापक, तीन शिक्षक व दोन क्लार्क अशा एकूण सहा जणांनाही अटक झाली आहे.
शिपाई महादू बोराडे व प्राचार्य वसंत गीते हे यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्य़ात पोलीस कोठडीत होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. दरम्यान, या बलात्कार प्रकरणात महादू बोराडे यांच्या कृत्यास पाठीशी घालून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, कर्तव्यात कसूर केली, तीन अपंग व अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे माहीत असताना देखील बोराडे यास पाठीशी घातल्या प्रकरणी उपमुख्याध्यापक रवींद्र मुरलीधर जगताप (वय ४८), शिक्षक शंकर भीमाजी भालेराव (वय ३८) शिक्षक दिलीप त्रिंबक गोसावी (वय ४७), कलाशिक्षक नवनाथ दगडू गजरे (वय ४८), क्लार्क सतीश पांडुरंग कडवे (वय ४०), हिरालाल गोकुलदास बाबेल (वय ४०) रा. आणे यांना आज रोजी नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.
या प्रकरणी ६ एप्रिल रोजी १२ वर्षांच्या मुलीने पहिली तक्रार दाखल केली. दुसरी तक्रार एका १६ वर्षीय अपंग मुलीने तीनच दिवसांनी दिली आहे, तर मंगळवारी ६० टक्के अपंग असलेल्या १६ वर्षांच्या मुलीने शिपाई बोराडे याच्याविरुद्ध तिसरी तक्रार दिली.