शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीत बनावट मतपत्रिका छापल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संस्थेच्या माजी संचालकांसह चौघांना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी ए. बी. कुलकर्णी यांनी त्यांना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अॅड. अभय सुमंत दाढे (वय ५०, रा. सदाशिव पेठ), जयंत बाळकृष्ण शाळीग्राम (वय ५१, रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता),प्रकाश कृष्णाजी जोशी (वय ७३, रा. सोलापूर), स्वप्नील यशवंत दळवी (वय ३२, रा. सदाशिव पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच अनंत माटे, सोमनाथ खराटे, प्रमोद मुळीक, समीर कारखानीस, भालेराव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दामोदर बद्रीनारायण भंडारी (वय ५५, रा. वडगांव मावळ ) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे शिक्षण प्रसारक मंडळीचे माजी संचालक, सभासद, पदाधिकारी आणि कर्मचारी आहेत.
बुधवारी पार पडलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीसाठी बनावट मतपत्रिका आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने पाकिटे छापल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शिक्षण प्रसारक मंडळीच्या कार्यालयातील कपाटात बनावट मतपत्रिका आणि पाकिटे मंगळवारी केलेल्या पाहणीत आढळून आली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२९ मार्च) विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. रात्री उशिरा अॅड. अभय दाढे यांना अटक करण्यात आली. तर प्रकाश जोशी यांना सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट यांनी दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी दाढे, जोशी, शाळीग्राम आणि दळवी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी बनावट मतपत्रिका कोठे छापल्या. टपाली मतदान करण्यासाठी शिक्के आणि पाकिटे तयार करण्यात आली. त्यादृष्टीने तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार आणि अनंत चौधरी यांनी केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य़ धरत आरोपींना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आणखी एक गुन्हा दाखल
धर्मादाय आयुक्तांनी २०१५ पासून शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ बरखास्त केले आहे. मात्र, तरीही अभय दाढे, जयंत शाळीग्राम, अनंत माटे हे संस्थेत पदाधिकारी असल्याप्रमाणे वागले व बरखास्त केलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांना संस्थेच्या आवारात मनाई केली, अशी फिर्याद जयंत विष्णुदास किराड (वय ५०, रा. नाना पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात बुधवारी दिली. त्यानुसार दाढे, शाळीग्राम व माटे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.