गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेला पुण्यातील वाहन चालक अनिल अनंतराव बोरकर (वय ४५, रा. शिवाजीनगर गावठाण) याचा तामिळनाडू येथील सराईत गुन्हेगारांनी पैशासाठी खून करून मृतदेह वेल्हे येथे टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तामिळनाडू येथील आरोपीला अटक केली आहे.
दाऊमणी शम्मूगम (वय २७, रा. तामिळनाडू) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊमणी व त्याच्या चार मित्रांनी चोरी करून ते मुंबईला बोरकरच्या मित्राकडे आले. त्या ठिकाणी बोरकरच्या मित्राने त्यांची राहण्याची व्यवस्था केली. पण, त्या ठिकाणीही पोलीस पोहोचल्याने ते आरोपी पुण्यात बोरकरकडे आले. त्याने त्यांची पर्वती येथे खोली घेऊन राहण्याची व्यवस्था केली. त्याच काळात मोटार खरेदीसाठी बोरकरने त्यांच्याकडून पाच लाख रूपये घेतले. ते पैसे आरोपी त्याला परत मागू लागले, पण बोरकरने त्यांना दिले नाहीत. चौघेजण पुण्यात दोन महिने राहून परत तामिळनाडूला गेले. काही दिवसांनी पैसे मागण्यासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी बोरकरला तुझ्या मुंबई येथील मित्राला भेटून येऊ म्हणून भाडय़ाने मोटार घेतली. मुंबईला जाऊन आनंदला भेटले, परत येताना राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुंगीने गळा आवळून बोरकरचा खून करून मृतदेह एका शेतात टाकून दिला व मोटार घेऊन पळून गेले.
बोरकर बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. मार्च महिन्यात बोरकरकडील मोटार तामिळनाडू येथे सापडली. त्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे यांनी त्या ठिकाणी जाऊन एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता दाऊमणी व त्याच्या साथीदारांनी बोरकरचा खून केल्याचे तपासात सांगितले.