अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ

पुणे : पुणे-लोणावळा लोकलच्या चार फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, त्याचा लाभ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना होणार आहे.  टाळेबंदीनंतर १२ ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक सुरू करण्यात आली होती. चार फेऱ्यांची वाढ केल्यामुळे आता दोन्ही बाजूने आठ फेऱ्या होणार आहेत.

टाळेबंदीनंतर पुणे-लोणावळा लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर मुंबईपाठोपाठ पुण्यातही उपनगरीय वाहतुकीतील काही गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये १२ ऑक्टोबरपासून चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत असलेल्या या सेवा अपुऱ्या पडत असल्याने २६ ऑक्टोबरपासून पुणे आणि लोणावळ्यातून प्रत्येकी दोन अशा चार नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानुसार आता पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ६.२५ आणि ८.०५ वाजता, तर संध्याकाळी ४.१५ आणि ६.०२ वाजता लोणावळ्यासाठी लोकल सोडण्यात येणार आहे. लोणावळ्यातून सकाळी ९.५५ व संध्याकाळी ५.३०, ५.५० आणि ७.३५ वाजता पुण्यासाठी लोकल सोडण्यात येत आहे. या सर्व गाडय़ा विशेष लोकल या श्रेणीतील असल्याचे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष ओळखपत्राची आवश्यकता

अत्यावश्यक सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलसाठी विशेष ओळखपत्राची आवश्यकता आहे. संबंधितांना ओळखपत्र देण्याची जबाबदारी राज्य शासनाने पोलीस आयुक्तांकडे दिली आहे. ‘क्यू आर कोड’सह असलेल्या या ओळखपत्राशिवाय स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. पुणे-लोणावळा दरम्यानच्या सर्व स्थानकांतील तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या असल्या, तरी या ओळखपत्राशिवाय तिकिटे दिली जाणार नसल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.