News Flash

वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या ४० बोटी स्फोटाने उडविल्या

अवैध वाळू उपसा करून या वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ४० बोटी स्फोट करून शुक्रवारी उद्ध्वस्त करण्यात आल्या.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलाशयात अवैध वाळू उपसा करून या वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ४० बोटी स्फोट करून शुक्रवारी उद्ध्वस्त करण्यात आल्या. बारामतीचे प्रांत अधिकारी संतोष जाधव आणि महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधातील अलीकडच्या काळातील ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईत वाळू माफियांच्या ४० बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या असून त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे.
उजनी धरणातील जलाशयावर भिगवणपासून ते अगदी पळसदेवपर्यंत दोन्ही तीरावर मोठय़ा प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात होता. महसूल विभागाने या अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींचे अनेकदा नुकसान केले होते. महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी येताच वाळू माफिया पळून जात असत. त्यामुळे कारवाई झाली तरी वाळू माफिया कधी सापडू शकले नाहीत. त्याच घटनेची पुनरावृत्ती शुक्रवारी झालेल्या कारवाईमध्ये घडून आली. मात्र, या कारवाईत वाळू माफियांच्या सुमारे अडीच कोटी रुपये किमतीच्या बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे उजनी धरणात सातत्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा करण्याचा प्रकार कसा राजरोस सुरू आहे याची प्रचिती येते.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केलेल्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमी आणि पक्षिमित्रांकडून स्वागत होत आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्याचे तहसीलदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये इंदापूर येथील महसूल विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी सहभाग घेतला होता. इंदापूर तालुक्यातील भिगवण, डिकसळ, डाळज, पळसदेव यासह दौड तालुक्यातील खानोटा या भागामध्ये ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 3:27 am

Web Title: 40 boats blasted by revenue dept
Next Stories
1 विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी शाळांमध्ये होणार प्रयत्न
2 वाचनवेडय़ाचे आगळे संकेतस्थळ
3 ‘कारभारी’ म्हणतात, पिंपरी-चिंचवडचा यापुढे विस्तार नको!
Just Now!
X