उन्हाळ्यात वाढलेला वीजवापर आणि वीजदरवाढीच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीच्या कालावधीतील वीज देयक वाढल्याने ग्राहकांमध्ये त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पुणे परिमंडलात ४० हजारांहून अधिक ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या. मात्र, ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तक्रार निवारण केंद्रांच्या माध्यमातून ९८ टक्के ग्राहकांच्या शंका आणि तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.

टाळेबंदीत बंद केलेले मीटरचे वाचन (रिडिंग) आता बहुतांश भागात सुरू झाले असल्याने एकत्रित वीज देयके ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. दरम्यानच्या कालावधीत सरासरीनुसार देण्यात आलेली देयके ग्राहकाने भरली असल्यास स्थिर आकार आणि कर वगळून इतर रक्कम एकत्रित देयकातून वजा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एकूण वीजवापराबाबत वीजदरांच्या टप्प्याचा लाभही ग्राहकांना देण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान वीजदरवाढ लागू झाली. त्याचप्रमाणे उन्हाळा आणि टाळेबंदीत बहुतांशजण घरातच असल्याने वीजवापरही वाढला. त्यामुळे वीज देयके वाढीव असल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या. ग्राहकांचे शंका निरसन करून तक्रारी सोडविण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, वेल्हे आणि मुळशी तालुक्यांमध्ये महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात पुणे शहरात सुमारे २० हजार ५००, पिंपरी-चिंचवड शहरात ११ हजार २०० आणि हवेली ग्रामीण, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, वेल्हे व मुळशी तालुक्यांमध्ये ९१०० ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयांत जूनच्या वीजबिलासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यापैकी सुमारे ४० हजार तक्रारकर्त्यांच्या शंका निरसन करण्यात आले. उर्वरित सुमारे ८०० ग्राहकांच्या वीज देयकांवर मीटर सदोष असणे, घर बंद असल्याने किंवा अन्य कारणांमुळे मीटर वाचन घेता न येणेआदी कारणे दिसून आलेली आहेत. या तक्रारींच्या निवारणाची कार्यवाही सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

स्वत:च वीज देयक पडताळा!

वीज देयकाबाबत तक्रारी आणि शंका दूर करण्यासाठी पुणे परिमंडलात महावितरणने आतापर्यंत १७९ सोसायटय़ांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच कार्यालयस्तरावर ७४९ वेबिनारचे आयोजन केले आहे. प्रत्येक ग्राहकाला घरबसल्या आपले देयक पडताळून पाहता येते. त्यासाठी  https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ हा दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहक क्रमांक दिल्यास टाळेबंदीतील तीन महिन्यांच्या देयकाचा तपशील त्यात उपलब्ध होतो आहे.