महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच ‘म्हाडा’च्या पुणे विभागाने चार वर्षांत ४० हजार घरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
वायकर यांनी म्हाडाच्या पुणे कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर म्हाडाच्या नाशिक आणि नागपूर विभागाला भेट दिल्यानंतर आज पुण्याला आलो आहे. २०२२ पर्यंत सर्वाना चांगले घरकूल मिळावे हे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्यासाठी म्हाडा कार्यरत राहणार आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. पुणे विभागामध्ये चार वर्षांत ४० हजार घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे वायकर यांनी सांगितले.
म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा कसा आहे, घरांच्या वितरणासाठी राबविण्यात येत असलेली लॉटरी पद्धती योग्य आहे की नाही, बाहेरच्या घरांचा दर म्हाडापेक्षा कमी आहे की जास्त या सर्व बाबींचा विचार करण्यात येत असल्याचे सांगून रवींद्र वायकर म्हणाले, नाशिकमध्ये म्हाडाच्या घरांची बाजारभावापेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याची तक्रार आली होती. त्या पाश्र्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांसारखे कमिशन घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या पॅनेलवर चांगले वास्तुविशारद आणण्याचे धोरण स्वीकारले आहे.

गृहनिर्माण धोरण लवकरच
राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर होणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर हे धोरण जाहीर होणार असल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले. म्हाडाच्या जुन्या वसाहतींसाठी अडीचऐवजी तीन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा ही मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे याकडे लक्ष वेधले असता वायकर यांनी या संदर्भात लवकरच बैठक बोलावून दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले. पुण्याच्या विकास आराखडय़ाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी म्हाडासाठी काही जमिनींचे आरक्षण असावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही वायकर यांनी सांगितले.