पुणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर चार ही धरण शंभर टक्के भरले आहे. या चार ही धरणात संततधार पाऊस असल्याने खडकवासला धरणातून रात्री अकरा वाजता मुठा नदी पात्रात 41 हजार 624 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागांकडून देण्यात आली आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून दोन हजार क्युसेक पाण्याच्या विसर्ग पासून सुरुवात झाली होती. त्यात टप्या टप्प्याने वाढ होत 45 हजार 474 पाण्याचा विसर्ग काल दुपार पर्यत्न होता. या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रालगत राहणार्‍या नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची घटना घडली होती. मात्र धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने तोच विसर्ग निम्म्यावर करण्यात आला होता. त्यामुळे काही नागरिक घरी जाऊन साफसफाई करून राहण्यास देखील लागले. मात्र आता पुन्हा धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाटबंधारे विभागाकडून आज रात्री अकरा वाजता मुठा नदी पात्रात 41 हजार 624 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रालगत राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.