नगरसेवकांची संख्या १६२ होणार

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१ प्रभागांची प्रारूप रचना महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. या प्रारूप रचनेमध्ये ४ सदस्यांचे ३९ प्रभाग, तर ३ सदस्यांचे २ प्रभाग अशी विभागणी आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत १० ने वाढ होऊन नगरसेवकांची संख्या १६२ होईल.

महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्यासाठीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून प्रभागांची प्रारूप रचना ७ सप्टेंबपर्यंत विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीला सादर करण्यात येणार आहे. महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन शक्य तेथे चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार सदस्यांचा प्रभाग होत नसेल तर एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे करण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही प्रारूप रचना महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. प्रारूप रचनेचा हा आराखडा बुधवारी (७ सप्टेंबर) त्रिस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.  त्यामध्ये दुरुस्ती करून १२ सप्टेंबपर्यंत तो निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबपर्यंत त्याला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळण्याची शक्यता असून ७ ऑक्टोबर रोजी आरक्षणाची

सोडत काढली जाणार आहे.  प्रभागाच्या प्रारूप रचनेनुसार नगरसेवकांची संख्याही १० ने वाढणार आहे. सध्या महापालिकेमध्ये १५२ नगरसेवक आहेत. प्रारूप प्रभागानुसार ती १६२ होणार आहे. प्रारूप प्रभाग रचना करताना भौगोलिक सीमा लक्षात घेण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेला उत्तर दिशेकडून सुरुवात होणार आहे. उत्तर, पूर्व, पश्मिच आणि दक्षिण दिशेनुसार ही रचना करण्यात येणार आहे.