शहरात सध्या दमदार पाऊस सुरू असून, या हंगामात पडलेला पाऊस सरासरीच्या पुढे आहे. पुणे वेधशाळेत १ जूनपासून आतापर्यंत ३०९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, हा आकडा सरासरीच्या तुलनेत ९० मिलिमीटरने अधिक आहे. याचबरोबर पुण्याच्या धरणांच्या क्षेत्रात गेली आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणांच्या साठय़ात नऊ टक्क्य़ांची वाढ होऊन तो ४३ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.
पुण्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून रात्री साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांत १२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पुण्याच्या पावसाने १ जूनपासून आतापर्यंत ३०० मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत एकूण ३०९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत हा आकडा ९० मिलिमीटरने अधिक आहे. पुणे शहराप्रमाणेच लोहगाव येथे या काळात २६३ मिलिमीटर, तर पाषाण येथे सुमारे ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेतील अधिकारी एस. बी. गावकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्याची धरणे ४३ टक्के
पुण्याला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमध्ये आतापर्यंत ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेषत: गेल्या आठवडय़ाभऱ्यात त्यात नऊ टक्के वाढ झाली. हा एकूण साठा आता १२.६ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये मिळून केवळ १.६६ टीएमसी इतकेच पाणी होते. सध्या धरणांच्या क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने पाण्याचा आणखी साठा वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या खडकवासला धरण १५ टक्के, पानशेत ५७ टक्के, वरसगाव ३९ टक्के, तर टेमघर धरण ३४ टक्के भरले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवणारे पवना ५६ टक्के भरले आहे. पुण्याची धरणे समाधानकारक भरली असल्याने खालच्या कमी पावसाच्या भागासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांनी दिली. गेल्या १० दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडण्याचा वेग १४०० घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक) इतका आहे. त्यामुळे इंदापूपर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे तलाव भरून घेण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

धरणांची टक्केवारी :
पुण्यासाठीची धरणे    ४३
खडकवासला    १५
पानशेत        ५७
वरसगाव        ३९
टेमघर        ३४
पवना        ५६