पुणे : राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण करोना संसर्गाने ग्रासले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच १९ एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांची रुग्णालये यांचे रूपांतर करोना रुग्णालयांमध्ये केल्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर थेट करोना रुग्णसेवेत नसले तरी सातत्याने रुग्णालयात वावरल्याने, कोणत्याही प्रतिबंधात्मक उपायांशिवाय वसतिगृहात राहिल्याने विद्यार्थ्यांना करोना विषाणू संसर्गाची लागण होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि एकाच खोलीत वास्तव्य करणारे मित्र यांनाही संसर्ग झाल्याची संख्या प्रचंड आहे.

अशा वातावरणात परीक्षा नकोत, त्या पुढे ढकलल्या जाव्यात किं वा ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉ. आशिष (नाव बदलले आहे.) म्हणाला, एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असल्यामुळे थेट करोना वॉर्डात रुग्णसेवा बजावत नाही, मात्र इतर वॉर्डमध्ये के वळ मुखपट्टीसह आम्ही रुग्णसेवा देत आहोत. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता होती. दुसऱ्या लाटेच्या काळातील रुग्णसेवेदरम्यान लक्षणे दिसली, चाचणी के ली असता संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टर असल्यामुळे घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले.

मात्र, जे वसतिगृहात राहतात त्यांना विलगीकरणाची सुविधा नाही. त्यामुळे साहजिकच खोलीत राहणारे मित्र-मैत्रिणी बाधित होतात. अशा अवस्थेत परीक्षा देणे म्हणजे जे निरोगी आहेत त्यांच्यापर्यंत संसर्ग पोहोचवणे आहे. प्रशिक्षणार्थी डॉ. स्मिता (नाव बदलले आहे.) म्हणाली, संसर्ग आहे हे समजल्यानंतरही उपचारांसाठी आमच्या महाविद्यालय किं वा रुग्णालयाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. कोणी साधी चौकशीही के ली नाही.  औषधे मिळाली नाहीत. आम्ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर असूनही आमच्याबाबत ही बेफिकिरी निराशाजनक आहे. बाधित विद्यार्थी किं वा विद्यार्थिनीला विलगीकरण करण्यासही स्वतंत्र खोली उपलब्ध नसल्याने बाधित येणे म्हणजे घरातील किं वा वसतिगृहातील इतरांना संसर्ग देणे असे समीकरण झाले आहे.

‘अस्मी’चा पाठिंबा

‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटन्र्स’ चा अध्यक्ष डॉ. वेदकु मार घंटाजी म्हणाला, परीक्षा पुढे ढकलणे किं वा ऑनलाइन परीक्षा घेणे हे पर्याय द्यावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच, पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करावा. परीक्षा देण्यास आमचा विरोध नाही, मात्र मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी डॉक्टरच बाधित होत असताना परीक्षा नको, याबाबत आम्ही आग्रही आहोत.