सर्व राजकारण्यांना स्वत:चे नाव सर्वत्र झळकवण्याचा किती सोस असतो हे अनेक सार्वजनिक ठिकाणी सातत्याने दिसते. महापालिकेच्या सभागृह नूतनीकरणातही राजकारण्यांचा हा नावाचा सोस पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीचे १९५५ साली झालेले भूमिपूजन आणि १९५८ साली झालेल्या उद्घाटनाच्या कोनशिलांवर जेमतेम तीन नावे आणि नूतनीकरणाच्या फलकावर सत्तेचाळीस नावे असा प्रकार आता महापालिकेत पाहायला मिळत आहे.
साडेतीन कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण झालेल्या महापालिका सभागृहाचे उद्घाटन गेल्या आठवडय़ात केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वीच्या कोनशिलांची जागा आता नव्या स्वरूपातील पितळी पाटय़ांनी घेतली आहे. नूतनीकरणाच्या निमित्ताने सभागृहाच्या मुख्य प्रवेशदारातही नव्या स्वरूपातील जी पितळी पाटी बसवण्यात आली आहे, त्या पाटीवर थोडीथोडकी नव्हे, तर आयुक्त वगळता चक्क ४६ राजकारण्यांची नावे कोरण्यात आली आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या इमारतीची कोनशिला १४ ऑगस्ट १९५५ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बसवण्यात आली होती. या कोनशिलेवर चव्हाण यांच्या बरोबरच तत्कालीन महापौर बाबुराव सणस आणि आयुक्त ल. मा. नाडकर्णी यांची नावे कोरण्यात आली आहेत. पुढे या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९५८ रोजी करण्यात आले होते. या कोनशिलेवर डॉ. राधाकृष्णन् तसेच तत्कालीन महापौर भाऊसाहेब शिरोळे आणि आयुक्त श्री. वि. भावे यांची नावे आहेत. या दोन्ही कोनशिलांवर प्रमुख पाहुणे, महापौर आणि आयुक्त यांच्या खेरीज तिसरे नाव नाही. सभागृह नूतनीकरणानिमित्त लावण्यात आलेल्या पाटीवर मात्र नावांची मोठी थोरली लांबड कोरलेली दिसत आहे. विशेष म्हणजे मंत्री, आमदार, खासदार, विविध पक्षांचे नेते आदी सत्तावीस जणांची नावे पाटीवर असली, तरी प्रत्यक्ष कार्यक्रमाला त्यांच्यापैकी पवार, रामदास आठवले, आमदार गिरीश बापट आणि बापू पठारे हे चौघेच उपस्थित होते.