जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकार्‍यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वंशाला दिवा हवा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या ४६ वर्षीय शिक्षकाने चक्क एका १९ वर्षीय तरुणीबरोबर लग्न केले आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर शिक्षकासह त्याला सहकार्य करणार्‍या १५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वंशाला दिवा हवा म्हणून अर्धे आयुष्य सरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. तरुणीच्या आई-वडिलांना पुण्यात नवीन घर विकत घेऊन देण्याचे आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर फोडण्याचे आमिष दाखवून १९ वर्षाच्या युवतीबरोबर आपले लग्न लावून घेतले आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाला चौदा वर्षांची स्वतःच्या पोटची मुलगी आहे. वयाच्या पन्नाशीकडे झुकलेल्या या शिक्षकाच्या आमिषाला आई-वडीलही बळी ठरले, आणि त्यांनी उत्तम काळे या शिक्षकाबरोबर आपल्या तरण्याताठ्या मुलीचे लग्न लावून दिले. पीडित तरुणीने नकार देत पोलीस ठाणे गाठल्यानंतर हा सगळा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेरखेडा येथील उत्तम काळे या शिक्षकाचे पूर्वी लग्न झालेले आहे. पूर्वीच्या पत्नीपासून त्याला चौदा वर्षाची एक मुलगीदेखील आहे. पहिली पत्नी तरुण मुलीचे आई-वडील यांनी संगनमताने नवीन विवाहाचा घाट घातला. तोही फक्त वंशाला दिवा हवा एवढ्या एका कारणासाठी. नवर्‍याला चौदा वर्षांची मुलगी असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला. मात्र पुण्यात चांगले घर आणि कर्ज फेडण्याचे आमिष आई-वडिलांना बळी पडायला पुरेसे ठरले. या तरुणीला उत्तम काळे नावाच्या शिक्षकासोबत बळजबरीने विवाह बंधनात अडकविण्यात आले. मुलगी तेरखेडा येथील सासरी गेली. नवविवाहितेने तिथून सुटका करून घेण्याचा चंग बांधला. अखेर काही दिवसानंतर तिला या जाळ्यातून बाहेर पडण्याची संधी मिळाली आणि तिने उस्मानाबाद पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तिला आई-वडिलांच्या स्वाधीन करून पिंपरी-चिंचवडच्या सांगवीतील घरी त्यांना पाठविण्यात आले. मात्र ज्याच्याशी तुझे लग्न लावून दिले आहे, त्याच्याशीच संसार करावा लागेल अशी बळजबरी आई-वडिलांनी केली. त्यानंतर तिने आई-वडिलांच्या विरोधात थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले आणि तेथे आई-वडील, पती, त्याची पहिली पत्नी यासह पंधरा जणांविरोधात तक्रार दाखल केली. सांगवी येथील पोलिसांचे एक पथक आता उत्तम काळे याच्यासह १५ जणांवर कारवाई करण्यासाठी उस्मानाबादला रवाना झाले आहे.

अशी करून घेतली सुटका
पीडित तरूणीने मोबाइल फोनमधील व्हाट्स अ‍पच्या आधारे स्वतःचा व्हिडिओ तयार करून कैफियत मांडली. हा व्हिडिओ उस्मानाबाद जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या व्हाट्स अ‍प क्रमांकावर अपलोड केला. मुख्यालयातून हा व्हिडिओ येरमाळा पोलिसांना पाठविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि येरमाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी पीडितेची सुटका केली.