‘ओपन सिग्नल’चा अहवाल

‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जात असले, तरी नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार फोर-जी मोबाइल नेटवर्कच्या उपलब्धतेमध्ये देशातील वीस प्रमुख शहरांमध्ये पुणे थेट विसाव्या स्थानी गेले आहे. पुणेच नव्हे, तर राज्यातील मुंबईसह कोणत्याही शहराला पहिल्या दहामध्ये स्थान मिळू शकलेले नाही. पटना शहर मात्र फोर-जी नेटवर्क उपलब्धतेत पहिल्या स्थानावर झळकले आहे. मोबाइल नेटवर्क उपलब्धता आणि वेग सातत्याने तपासणाऱ्या ‘ओपन सिग्नल’ने  हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

‘ओपन सिग्नल’च्या वतीने वेळोवेळी देश आणि विदेशातील मोबाइल नेटवर्कबाबतचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा १ डिसेंबर २०१७ पासून ९० दिवस फोर-जी नेटवर्कच्या उपलब्धतेबाबत देशातील वीस शहरांमध्ये मोजणी करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. पटना शहरामध्ये फोर-जी नेटवर्कची उपलब्धता ९२.६१ टक्के असल्याने हे शहर पहिल्या स्थानावर आहे. पुण्यात ही टक्केवारी ८१.८३ टक्के असली, तरी सर्वेक्षण केलेल्या शहराच्या यादीमध्ये पुणे सर्वात तळात विसाव्या स्थानी गेले. िपपरी-चिंचवड शहर क्रमवारीत एक अंकाने पुण्याच्या वर म्हणजेच १९ व्या स्थानी असून, तेथे ८४.०५ टक्के उपलब्धता आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही.

पहिल्या दहा क्रमांकामध्ये पटना, कानपूर, अलाहाबाद, कोलकाता, भोपाळ, जयपूर, अहमदाबाद, लखनौ, चंडीगड, बंगळुरू आदी शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शहरांची क्रमवारी पाहिल्यास अकराव्या स्थानी नागपूर, तर पंधराव्या स्थानी मुंबई असून, तेथे फोर-जी नेटवर्क उपलब्धता ८६.३९ टक्के आहे. १८ व्या स्थानी नवी मुंबई, तर १९ व्या स्थानी िपपरी-चिंचवडचा समावेश आहे.

देशाची राजधानी असलेले दिल्ली शहरही या यादीमध्ये सतराव्या स्थानी आहे. पहिल्या दहामध्ये असलेल्या मध्य आणि पूर्व भारतातील शहरांमध्ये फोर-जी नेटवर्कची सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. उपलब्धतेमध्ये या राज्यांची दक्षिणेतील राज्यांशी अगदी अटीतटीची स्पर्धा आहे. मात्र, दक्षिण आणि पश्चिम भागातील शहरांमध्ये फोर-जी नेटवर्क सेवेचा वेग अधिक आहे. सर्वेक्षण केलेल्या सर्वच शहरांमध्ये फोर-जी नेटवर्कची उपलब्धता ८० टक्क्य़ांच्या पुढे आहे. त्यामुळे जगातील फोर-जी नेटवर्कच्या प्रगत बाजापेठा असलेल्या शहरांच्या जवळपास ही शहरे गेली आहेत. पुढील काळामध्ये मोबाइल संदेश वहन क्षेत्रामध्ये तीन कंपन्यांचे विलिनिकरण होणार असल्याने त्यामुळे फोर-जी नेटवर्क उपलब्धतेत वाढ होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

फोर-जी नेटवर्क उपलब्धता टक्केवारी

१- पटना (९२.६१), २- कानपूर (९१.३३), ३- अलाहाबाद (९१.०६), ४- कोलकाता (९१.०२), ५- भोपाळ (९०.९९), ६- जयपूर (९०.३१), ७- अहमदाबाद (८९.९३), ८- लखनौ (८९.३५), ९- चंडीगढ (८८.४६), १०- बंगळुरू (८८.२९), ११- नागपूर (८८.२३), १२- सूरत (८७.५८), १३- गाझियाबाद (८७.०५), १४- हैदराबाद (८७), १५- मुंबई (८६.३९), १६- चेन्नई (८६.१५), १७- दिल्ली (८५.८३), १८- नवी मुंबई (८५.७०), १९- िपपरी- चिंचवड (८४.०५), २०- पुणे (८१.८३).