X
X

बालेवाडीतील टेनिस स्पर्धेसाठी पाच कोटी

असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) या संघटनेमार्फत चेन्नईत टेनिस स्पर्धा घेण्यात येतात.

 

राष्ट्रवादीच्या विरोधानंतर निधीला बहुमताने मंजुरी

पुण्यात बालेवाडी येथे होणाऱ्या टेनिस स्पर्धेसाठी प्रतिवर्षी एक कोटी याप्रमाणे पाच वर्षांसाठी पाच कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव सभेने मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केल्याने या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. प्रस्तावाच्या बाजूने ४५ तर विरोधात १८ मतदान झाले. अखेर, हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौर नितीन काळजे यांनी जाहीर केले.

असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स (एटीपी) या संघटनेमार्फत चेन्नईत टेनिस स्पर्धा घेण्यात येतात. यंदा तेथे या स्पर्धा होणार नाहीत म्हणून ‘महाराष्ट्र ओपन’ या नावाने या स्पर्धा पुढील पाच वर्षांसाठी पुण्यात बालेवाडीत होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी प्रतिवर्षी एक कोटी याप्रमाणे पाच वर्षांसाठी पाच कोटी रुपये पिंपरी पालिकेकडून देण्यात येणार आहेत. त्यानुसार, मंगळवारी सभेपुढे प्रस्ताव मांडण्यात आला होता. राष्ट्रवादीने या प्रस्तावास कडाडून विरोध केला. विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर वैशाली घोडेकर, नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख आदींनी विरोधाची भूमिका मांडली. आयोजक संस्था अपयशी ठरलेली आहे. या स्पर्धाचा शहरासाठी उपयोग नाही. नाव पुण्याचे होणार असताना आपण इतकी रक्कम का द्यायची, हा धनिकांचा खेळ आहे, गरिबांना त्याचा काही उपयोग नाही, पाच कोटी वाया जातील. यापूर्वी, बालेवाडीला आपण खूपच मदत केली आहे, असे विरोधी मुद्दे राष्ट्रवादीकडून मांडण्यात आले. तथापि, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह भाजप नगरसेवकांकडून हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी आग्रह धरण्यात आला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासनाची भूमिका मांडताना या स्पर्धाची उपयुक्तता सांगितली. अखेर, हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यानुसार, प्रस्ताव मंजूर करावा, या बाजूने ४५ मते पडली, तर विरोधात १८ मते होती. मनसे व काही अपक्ष नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. अखेर, ‘एटीपी’ या संस्थेला पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौरांनी जाहीर केले.

20
Just Now!
X