सैन्य दलातील सेवेत असताना वीरगती आलेल्या जवानांच्या पत्नी किंवा मुलांना सीएस अभ्यासक्रमांत पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया’ने घेतला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी इ-लर्निग अभ्यासक्रमही येत्या दोन वर्षांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अतुल मेहता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आयसीएसआयचे राष्ट्रीय सदस्य मकरंद लेले आणि पुणे शाखेचे अध्यक्ष अमित अत्रे उपस्थित होते. सैन्य दलातील सेवेत असताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी आणि मुलांना अभ्यासक्रम आणि परीक्षा शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आयसीएसआयने घेतला आहे. त्याचप्रमाणे गुणवान विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सीएसचे विविध टप्पे उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
स्किल इंडिया उपक्रमांतर्गत संस्थेने प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पंधरा दिवसांच्या कालावधीचे प्रशिक्षण करता येणार आहे. या शिवाय विद्यार्थ्यांसाठी संस्थेकडून इ-साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये दृकश्राव्य माध्यमातून व्याख्याने, अॅनिमेशन, प्रश्नोत्तरे यांचा समावेश असणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. संस्थेने मोबाईल अॅप्लिकेशनही तयार केले असून गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे.