‘९९ एकर्स’ संकेतस्थळावरील एप्रिल ते जून त्रमासिक अहवालातील निष्कर्ष

पुणे : टाळेबंदी कालावधीत सदनिकांच्या भांडवली मूल्यामध्ये स्थिरता असली, तरी पुण्यातील सदनिका खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ५० टक्क्य़ांची घट झाली आहे. घर खरेदी-विक्री व्यवहारातील अग्रेसर असलेल्या ‘९९ एकर्स’ या संकेतस्थळाने एप्रिल ते जून-२०२० या त्रमासिक अहवालामध्ये हा निष्कर्ष नोंदविला आहे.

‘९९ एकर्स’ या संकेतस्थळाने पुण्यातील बांधकाम क्षेत्र, सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांबाबतचा त्रमासिक आढावा घेतला आहे. टाळेबंदीचा कालावधी आणि टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या बांधकाम क्षेत्रापुढे काही अडचणी निर्माण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण घरांची मागणी टाळेबंदीच्या कालावधीतही दिलासादायक ठरली.

आर्थिक अडचणी आणि संकट, त्यातून घरांची कमी झालेली मागणी यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ५० टक्क्य़ांची घट झाल्याचा निष्कर्ष त्रमासिक अहवालात नोंदविण्यात आला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत १ हजार ८०० घरांची विक्री झाली. जानेवारी ते मार्च २०२० या कालावधीत पाच हजार व्यवहार नोंदविण्यात आले होते.

या परिस्थितीमुळे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी नव्या प्रकल्पांना स्थगिती दिली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत ६५ टक्के प्रकल्पांची घोषणा होऊ शकली नाही. टाळेबंदीच्या नियमातील शिथिलतेनंतर टप्पाटप्प्याने काही प्रकल्प सुरू करण्यात आले, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

या संदर्भात बोलताना संकेतस्थळाचे मुख्य व्यवसाय अधिकारी मनीष उपाध्याय म्हणाले की, एप्रिल ते जून या कालावधीत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आणि विकसकांनी डिजिटल प्रकल्प जाहीर केले. बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक संकेतस्थळांवरून प्रकल्पांची माहिती जाहीर करण्यात आली. अनेक खरेदीदारांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून घरांची माहिती घेतली. करोना संकटातील काही अडथळ्यानंतर बांधकाम क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ‘९९ एकर्स’ संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ७५ टक्के नोंदणीकृत खरेदीदार संकेतस्थळाच्या माध्यमातूनच मालमत्ता खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचेही आढळून आले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पांना भेटी देण्यापूर्वी संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याची माहिती घेण्याकडेही खरेदीदारांचा मोठा कल आहे.

स्थिर राहिलेला रेडीरेकनर, तरलतेचा अभाव आणि व्यस्त मागणी यामुळे घर खरेदीवर परिणाम झाला आहे. बांधकाम क्षेत्रात मंदी असतानाही व्यावसायिक आणि विकसकांकडून सवलती जाहीर करण्यात नकार देण्यात आल्यामुळे मालमत्तांचे दर स्थिर राहिले आहेत.

बावधन, हिंजवडीत प्रशस्त घरांची मागणी कायम

बावधन, बालेवाडी, हिंजवडी, वाकड, खराडी, लोहगाव या सारख्या भागात दर्जेदार आणि प्रशस्त घरांची मागणी कायम आहे. नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी या भागात ७० टक्के  प्रकल्पांची घोषणा के ली आहे. धनकवडी, वडगांव बुद्रुक आणि वानवडी या भागालाही खरेदीदारांची पसंती आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पुणे-मुंबई बाह्य़वळणाचा फायदा धनकवडी, वडगांव बुद्रुक या भागाला होत आहे. सदनिका भाडेकराराने घेतल्यानंतर त्यापोटी देण्याच्या रकमेमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तिमाहीतही कायम होती. के शवनगर, विमाननगर, वारजे या भागात वर्षभरात भाडेकराराच्या रकमेत सात टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. मगरपट्टा आयटी पार्कमुळे के शवनगर येथील सदनिकांची मागणी वाढली आहे. बाणेर, औंध, हिंजवडी हा भाग माहिती तंत्रज्ञान कं पन्यांशी जोडला गेल्यामुळे येथेही घरांची मागणी वाढत आहे.