भीमा कोरेगांव येथील घटनेचे पडसाद पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उमटले. गेल्या दोन दिवसात पीएमपीच्या पन्नास गाडय़ांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे पीएमपीच्या गाडय़ांचे ८ लाख ६९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यव्यापी बंदमुळे पीएमपीची सेवाही दिवसभर खंडीत झाली होती. बंद मागे घेण्यात आल्यानंतर संध्याकाळपासून पीएमपीची सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.

भीमा कोरेगांव येथील घटनेनंतर शहरात काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच बुधवारी राज्यव्यापी बंदच्या पाश्र्वभूमीवरही पीएमपीच्या गाडय़ांची तोडफोड करण्यात आली. एक जानेवारी ते तीन जानेवारी या कालावधीत पीएमपीच्या ५० गाडय़ांचे नुकसान करण्यात आले आहे. त्यात ४३ गाडय़ा महामंडळाच्या मालकीच्या असून सात गाडय़ा खासगी ठेकेदाराच्या असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली.

आव्हाळवाडी, मांजरी, पुणे स्टेशन, खराळवाडी, गुलटेकडी, राजीव गांधी नगर परिसर, अप्पर इंदिरानगर, कॅम्प, देहूगांव, चिखली, येरवडा चौक, लोणीकंद फाटा, दांडेकर पूल, पानमळा, बोपदेव घाट, उदयनगर (िपपरी), नेहरुनगर चौक, लोकमान्य चौक, साधू वासवानी चौक, तळेगांव, देहूगांव, वडगांव येथे पीएमपीच्या गाडय़ांवर दगडफेक करण्यात आली.

स्वारगेट आगाराकडील दहा गाडय़ांवर, नेहरुनगर आगाराच्या ११ गाडय़ांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पुणे स्टेशन, नेहरुनगर आणि मार्केट यार्ड आगाराकडील प्रत्येकी चार, कात्रज, शेवाळवाडी आणि भोसरी आगाराकडील प्रत्येकी एका गाडय़ांचे नुकसान झाले आहे. हडपसर आगाराकडील सात गाडय़ांची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनांमुळे पीएमपीच्या सेवेवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. बुधवारी राज्यव्यापी बंद असल्यामुळे बहुतांश आगार आणि स्थानकांमध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी राहिली. बसही आगारात थांबविण्यात आल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास तेराशे गाडय़ा रस्त्यावर आणण्याचे नियोजन पीएमपीकडून करण्यात आले होते. मात्र दगडफेकीच्या घटना आणि बंदच्या पाश्र्वभूमीवर गाडय़ांची सेवा थांबिवण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने काही मार्गावर पीएमपीकडून बस व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. बुधवारी संध्याकाळी बंद मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर आठशे ते नऊशे गाडय़ा रस्त्यावर आणण्याचे नियोजन प्रशासनाकडून केल्याची माहिती देण्यात आली.