राष्ट्र सेविका समितीच्या वतीने रविवारी शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या पाचशे सेविकांनी संचलनात भाग घेतला. समितीच्या घोष (वाद्य) पथकाने प्रारंभी समताभूमी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. या निमित्ताने शस्त्रपूजन समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते.
समितीतर्फे दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने संचलन केले जाते. यंदा शहराच्या पूर्व भागातील विविध पेठांच्या परिसरात हे संचलन काढण्यात आले. संचलनाची सुरुवात घोरपडे पेठेतील महात्मा गांधी विद्यालयातून करण्यात आली. समताभूमी, महात्मा फुलेवाडा तसेच भवानी, नाना पेठ आदी भागातून फिरून संचलनाची सांगता झाली. तत्पूर्वी समितीच्या घोष पथकाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. समताभूमी येथे हा कार्यक्रम झाला. संचलनापूर्वी पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा जोशी, प. महाराष्ट्र प्रांत कार्यवाहिका पूनम शर्मा, महानगर कार्यवाहिका मीना कानडे, कुमुद कुलकर्णी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.