दत्तवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मागील दहा महिन्यामध्ये त्यांनी केलेले २० गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे.
निखिल कमलेश जयस्वाल (वय २१, रा. शिवशंकर सोसायटी, माणिकबाग, सिंहगड रस्ता.), अजय बाजीराव मकर (वय २१, रा. स्टर्लिन निसर्ग, धायरी गाव.), सुनील हिरालाल सिंह (वय २०, रा. राज लॉज, तुळशीबाग, मंडई.), गणेश रामिलग कापसे (वय १९, रा. काकडे वस्ती, इंदिरानगर.) यांच्यासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफ निलेश उर्फ सोनू कमलाकर पंडित (रा. पाटोदा, जि. बीड.) याला अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी या कारवाईबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मनोज कुदळे यांना या आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. वडगाव बसथांब्याजवळ जयस्वाल, मकर व सिंह यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कापसे व पंडित यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिंहगड रस्त्यावरील सनसिटी, आनंदनगर आदी भागातील १९, तर स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. बनावट क्रमांक असलेली एक मोटारसायकलही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. चोरटय़ांकडून एकूण १६ लाख दोन हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
जयस्वाल याचे तुळशीबागेमध्ये पडद्याचे दुकान आहे. मकर हा त्याच्याकडे कामाला होता. सिंह हाही तुळशीबागेतच कामाला होता, तर अजय हा केटररकडे काम करतो. जयस्वाल व सराफ पंडित यांची पूर्वीपासूनच ओळख होती. त्यामुळे चोरलेले दागिने आरोपी पंडित याच्याकडे विकत होते.
पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त वसंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोवेकर, सहायक निरीक्षक संपत पवार, पोलीस कर्मचारी मनोज कुदळे, रघुनाथ जाधव, राजेश्वर राजपूत, रामचंद्र पवार, तानाजी निकम, गणेश सुतार, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, नीलेश जमदाडे यांनी ही कारवाई केली.