पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने बुधवारी आणखी एकाचा बळी घेतला. शिरुरच्या ५५ वर्षीय रुग्णाने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ रुग्णांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांतील स्वाइन फ्लूने घेतलेला हा दुसरा बळी असून जानेवारीपासून आतापर्यंत शहरात २९ रुग्ण दगावले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. यापूर्वी मंगळवारी एका ४५ वर्षांच्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाला होता. शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दोन दिवसांत दोघांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. मागील वर्षी पिंपरी-चिंचवडमधील ६३ जणांनी आपला जीव गमावला होता. १ जानेवारीपासून आत्तापर्यंत ४५८ रुग्णांनी स्वाइन फ्लूची तपासणी केली असून त्यातील १८६ जणांना या रोगाची लागण झाली आहे. त्यातील २९ जण दगावले आहेत.