ऑगस्ट महिना परीक्षेचा, तज्ज्ञांचा खबरदारीचा इशारा

पुणे : पुणे शहरातील करोना विषाणू संसर्गाचे सर्वाधिक चिंताजनक रूप जुलै महिन्यात दिसून आले असून ऑगस्ट महिना हा आणखी मोठय़ा आव्हानांचा जाणार असल्याचे भाकीत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुखपट्टी आणि सहा फु टांचे अंतर राखणे हे पुणेकरांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. एकटय़ा जुलै महिन्यात पुणे जिल्ह्य़ात तब्बल ५५,५८४ नवे करोनाचे रुग्ण सापडले असून ऑगस्टमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नऊ मार्चला पुणे शहरात राज्यातील पहिला करोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर दिवसागणिक ही रुग्णसंख्या वाढत गेली. पुणे शहरापाठोपाठ पुणे जिल्ह्य़ात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. मागील विशेषत: महिनाभराच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. पुणे जिल्ह्य़ाचा सर्वंकष विचार के ला असता ३० जून या दिवशी जिल्ह्य़ातील एकू ण रुग्णसंख्या २२,४२९ एवढी होती. २९ जुलै या दिवशी पुणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या ७८,०१३ एवढी झाली. म्हणजेच एकटय़ा जुलै महिन्यात जिल्ह्य़ातील नवीन ५५,५८४ जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यांमध्ये ग्रामीण भाग, छावणी परिसर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठय़ा रुग्णसंख्येचा समावेश आहे. एकाच महिन्यातील ही संख्या नागरिकांना धडकी भरवणारी असली, तरी त्यामागे शहरात सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा मोठा वाटा असल्याचे यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे, तसेच ऑगस्ट महिन्यात या साथीचा कळस पाहायला मिळणार असल्याचा तर्क ही वर्तवण्यात येत आहेत.

राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर चाचण्यांचे योगदान असले तरी याचा अर्थ आपण गृहित धरलेले रुग्णवाढीचे सगळे अंदाज कमी पडतील असे चित्र आहे. टाळेबंदीही संपली आहे, त्या दृष्टीने ऑगस्टमध्ये मोठय़ा रुग्णसंख्येला गृहित धरून तशी तयारी आरोग्य विभागाने करणे योग्य ठरणार आहे. तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत, मात्र त्याबरोबरच नागरिकांनी मुखपट्टी आणि सहा फु टांचे अंतर राखण्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे, कु टुंबातील सदस्यांना संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आरोग्य यंत्रणांवर अतिरिक्त ताण येऊ नये हे पाहता येईल, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट के ले.