मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

पिंपरी : राज्यभरात चर्चेत असलेल्या मावळ लोकसभेसाठी सोमवारी सुमारे ५८.२१ टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळात ५८.३९ टक्के मतदान झाले होते. यंदा रणरणते ऊन, मतदानाच्या चिठ्ठय़ा न मिळाल्याने उडालेला गोंधळ, नागरिकांना मतदानासाठी बाहेर काढण्यात राजकीय पक्षांना आलेले अपयश आदी कारणांमुळे चुरशीच्या या लढतीतही मतदानाची अपेक्षित टक्केवारी गाठता आली नाही. अनेक संवेदनशील मतदान केंद्र असतानाही निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मावळ लोकसभेच्या आखाडय़ात भाजप-शिवसेना महायुतीचे श्रीरंग बारणे, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह २१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वाचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद झाले. २३ मे ला मतमोजणी होणार आहे. पवार कुटुंबातील उमेदवार आणि महायुतीच्या नेत्यांची एकत्रित ताकद तसेच सुरूवातीपासून होत आलेल्या नाटय़मय घडामोडी आदींमुळे चर्चेत असलेल्या मावळ मतदारसंघात चुरशीची लढत आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ६५ ते ७० पर्यंत जाईल, असे आडाखे राजकीय नेत्यांनी आखले होते.  प्रत्यक्षात, ६० टक्क्य़ाच्या आतच मतदान झाल्याने अनेक तर्क आतापासूनच लढवण्यात येऊ लागले आहेत.

सोमवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरूवात  झाली. प्रारंभी मतदान संथ होत होते. नंतर, संमिश्र प्रतिसाद दिसत होता. मतदारांना चिठ्ठय़ा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी अनेक केंद्रावर झाल्या. उन्हाचा तडाखा सकाळपासूनच जाणवत होता. साडेनऊनंतर काही केंद्रांवर गर्दी दिसू लागली. कुटुंबासह एकत्रित मतदान करण्याचे प्रमाण लक्षणीय होते. चिंचवड मोहननगरला सकाळी अकराच्या सुमारास गर्दी नव्हती. त्याचवेळी, दुपारी बारा वाजता कृष्णानगरच्या गणगे विद्यालयात मात्र दुपारी १२ नंतरही रांगा लागलेल्या होत्या. बारा वाजेपर्यंत मतदानाचा वेग चांगला होता. दुपारी एक वाजेपर्यंत ३१. ११ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर, तीव्र उन्हाचा चटका बसू लागला, तसतशी गर्दी ओसरू लागली. दुपारी तीनपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. चार वाजता मतदानाला दोन तासाचा अवधी राहिला, तसे नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडू लागले. मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यामुळेच निर्धारित सहानंतरही मतदानाचे काम अनेक केंद्रांवर सुरू होते. सहापर्यंत ५८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. सविस्तर आकडेवारी जमा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, शहरात अनेक मतदान केंद्र संवेदनशील होती. निवडणुकीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार झाला नाही, असा दावा पोलिसांनी केला. खबरदारीचा उपाय म्हणून जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

*   रहाटणी येथील भिकोबा तांबे शाळेतील मतदान केंद्रात नऊ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला होता. रणरणत्या उन्हाचा मतदारांना त्रास होऊ नये, यासाठी संस्थाचालकांनी ही खबरदारी घेतली होती.

*  मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीही बहुतांश केंद्रांवर अनेकांनी मोबाइल आतमध्ये नेले. काही जणांनी स्वत:चे मतदान मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून त्याची चित्रफीत प्रसारित केल्याचे दिसून आले.

* पिंपळे गुरव येथे सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. तेथे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानी सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतली.

*  नवमतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.

शिरूरमध्येही ५८ टक्के मतदान

पुणे : चुरशीची लढत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे अंदाजे ५८.४ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील भोसरी, हडपसर हा शहरी भाग वगळता उर्वरित भागात ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. शिरूरमध्ये ५८ टक्के मतदारांनी केलेल्या मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) बंद झाले.

जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी शिरूर आणि मावळ या मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान झाले. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत ५९.५० टक्के एवढे मतदान झाले होते. यंदा शिरूरमध्ये ५८.४ टक्क्य़ांपर्यंत मतदान झाले असून, यंदा मतदान एक टक्क्य़ाने कमी झाल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ७२.०८ टक्के आणि सर्वात कमी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले होते. यंदा शहरी भाग असलेल्या भोसरी आणि हडपसर भागात अंदाजे ५४ टक्के मतदान झाले असून, उर्वरित जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूरमध्ये ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

शिरूरमध्ये मतदानाचा उत्साह

शिरूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ  या कालावधीत अवघे ६.३२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत हे प्रमाण १६.२१ टक्क्य़ांवर पोहोचले. अकरा ते एक या वेळेत या मतदारसंघात मतदार मतदानासाठी येण्याचे प्रमाण वाढले. एक वाजता २३.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी एकनंतर तीनपर्यंत ३९.९५ टक्के मतदान झाले होते. शिरूरमध्येही ऊन उतरल्यानंतर दुपारी चारनंतर मतदानासाठी मतदार बाहेर पडले. पाचवाजेपर्यंत ५१.२५ टक्के मतदान झाले होते. तर, सहा वाजल्यानंतर ५८.४ टक्के मतदारांनी मतदान केले.